मुंबई | महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळाले. ‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांना दररोज वेगवेगळी विधानं करून अडचणीत आणत आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहेत. सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना असं आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता.
चंद्रकांत पाटील यांच्या या प्रश्नाला आणि त्यांच्या विधानाचा समाचार घेत राऊत म्हणाले की, ‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझी नियुक्तीही खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली आहे’, असा टोला लगावला आहे.