HW News Marathi
महाराष्ट्र

स्वातंत्र्याची व्याख्या सोयीनुसार बदलली आहे, सामनातून भाजपवर रोख

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत, रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्वब गोस्वामी, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिगत स्वातंत्याची गळचेपी होत असल्याची बोंब मारली जात आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या कणाकणात स्वातंत्र्य आहे.पण विषय असा आहे की, स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जात आहे. इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली असा सिद्धांत जे मांडतात ते तरी आज वेगळे काय करीत आहेत? स्वातंत्र्याची व्याख्या काय असा सवाल रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारला आहे.

तसंच, ‘सुडाचे हत्यार म्हणून या संस्थांचा वापर सुरू आहे. सूडबुद्धीने वागणारे सत्ता उबवू शकतात, पण राष्ट्र चालवू शकत नाहीत’ अशी टीकाही राऊतांनी केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी ईडी चौकशी, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि कंगना रनौत प्रकरणावरून भाजपवर जोरदार प्रहार केला आहे

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून अभिनेत्री कंगना राणावत व अर्णब गोस्वामी प्रकरणाचा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधला आहे. “इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लादली गेली व पावलोपावली कायद्याचे उल्लंघन झाले. इंदिराजींच्या काँग्रेस राज्यात कोणाला राज्यघटनेची पर्वा नव्हती आणि न्यायालयाची प्रतिष्ठाही वाटत नव्हती. हा भाजपा पुढाऱ्यांचा मोठा आवडता सिद्धांत आहे.

या सिद्धांताचा उपसिद्धांत असा की, भाजपाचे पुढारी केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयाच्या प्रतिष्ठेला जिवापाड जपत आहेत, पण या उपसिद्धांतात कसा फोलपणा आहे हे अलीकडच्या घटना, घडामोडींवरून दिसत आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा घोडेबाजार सुरू झाला आहे व महाराष्ट्रातही त्यासाठी विविध स्तरांवर राजकीय खानावळी व स्टॉल्स उभे केले आहेत.

या स्टॉलवर कोणी फिरकला नाही म्हणून ईडीसारख्या संस्थांना पकडून स्टॉलवर जबरदस्तीने लोक आणण्याचा प्रयोग सुरू झाला. भाजपची केंद्रीय सत्ता असे बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे की, आम्ही सर्व सत्ताधीश आहोत. सर्वोच्च न्यायालयापासून ते सर्व स्तरांवरील तपास यंत्रणांवर फक्त आमचीच हुकमत चालते. आम्ही तुम्हाला रगडू शकतो. तेव्हा आमच्या स्टॉलवर रांग लावून उभे राहा,” अशी टीका राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

“भाजपाची स्टार प्रचारक कॉमेडियन भारती सिंगला आठ दिवसांपूर्वी गांजाचे सेवन व गांजा बाळगल्याप्रकरणी त्याच ‘एनसीबी’ने पकडले व फक्त २४ तासांत ही बया तिच्या नवऱ्यासह बाहेर पडली. रियाकडे कोणतेही अमली पदार्थ सापडले नव्हते हे विशेष! याचा अर्थ असा की, कायदा आणि न्यायव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण आहे. रिमोट कंट्रोल आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.

कोणतंही न्यायालय उभं राहत नाही

“मुंबईत राहणाऱ्या एका बेताल नटीने सुशांत राजपूतप्रकरणी बिनबुडाचे आरोप केले. मुंबईला पाकिस्तान, शिवसेनेला बाबर सेना, पोलिसांना माफिया म्हटले. यावर लोकांत संताप झाला. या नटीने नैतिकतेच्या गप्पा मारल्या, पण तिची कृत्ये बेइमानीचीच होती. ती पूर्वायुष्यात अमली पदार्थांचे सेवन करीत असे. त्याबाबत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका रॅकेटची ती सदस्य होती. तिने बेकायदेशीर बांधकाम करून ऑफिस थाटले होते. हे बेकायदा बांधकाम मुंबई पालिकेने बुलडोझर लावून तोडले. लोकांनी या कारवाईचे स्वागत केले. भाजपाला या कारवाईचे अतीव दुःख झाले.

बेकायदा बांधकाम तोडणे हा अन्याय आहे असे ते म्हणतात. पण न्यायालयानेही जणू त्या नटीच्या बेकायदा बांधकामावर झेंडू, मोगऱ्याची फुलेच उधळली आणि नटीचे बेकायदा बांधकाम तोडले म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेवर दंड ठोठावला. नटीस भरपाई देण्याचे आदेश दिले. मुंबईच्या रस्त्यांवरील पोटार्थी फेरीवाल्यांना बेकायदेशीर ठरवून हटवले जाते तेव्हा कोणतेही न्यायालय त्या गरीबांच्या मागे उभे राहत नाही,” असं म्हणत राऊत यांनी भूमिका मांडली.

“मग हा हक्क इतरांसाठी का नाही?”

“रिपब्लिकन टी.व्ही.चे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित होते काय, यावर संशोधन होणे गरजेचे आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात श्री. गोस्वामी यांना अटक झाली. अन्वय यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण मागच्या सरकारने दडपले. त्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली गेली. ही मागणी नाईक यांच्या पत्नीनेच केली. त्यावर पुन्हा तपास सुरू झाला. पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतले, पण आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत व केंद्रातील राज्यकर्ते आपल्यासाठी काहीही करतील या भ्रमात काही लोक आहेत व तसेच चित्र दिसले. पण खालच्या कोर्टाचे अधिकार चिरडून सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईने गोस्वामी यांना जामीन दिला व मुंबई हायकोर्टावर ताशेरे ओढले. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हा मुद्दा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर अलिबागच्या सेशन कोर्टात सुनावणी असताना सर्वोच्च न्यायालयाने एकदम सुप्रीम कोर्ट एकाच व्यक्तीसाठी उघडावे तसे केले. गोस्वामी यांना न्याय मागण्याचा, लढा देण्याचा पूर्ण हक्क आहे. मग हा हक्क इतरांसाठी का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून हाच सवाल केला आहे. इंदिरा गांधी तर अशा थराला जात नव्हत्या,” असं म्हणत राऊत यांनी भाजपाला टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिपी उद्घाटनाला पाहुणे म्हणून येताय… श्रेयावरून राणेंचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले

Aprna

शुट आउट अ‍ॅंड हिमायतबाग: आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी

News Desk