HW News Marathi
महाराष्ट्र

त्या ‘भुंकऱ्या’ अँकरला सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे – सामना 

मुंबई | राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर भाजप नेत्यांकडून सुरु असलेल्या आनंदोत्सवावर शिवसेनेकडून आजच्या (१९ नोव्हेंबर) सामानतून जोरदार टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सांगण्यात आले आहे.

‘सामना’तील या अग्रलेखात भाजप आमदार राम कदम, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांना नाव न घेता सणसणीत टोले लगावण्यात आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. मात्र, सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरु करुन भाजपमधील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव सुरु केला आहे.

मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दारी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वैगैरे लावत पोहोचले. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल. त्यांच्या मानेवर रिकामी मडकी आहेत, पण मडकी बनविणाऱ्या पांडुरंगभक्त गोरा कुंभाराच्या वंशजांनाही आम्ही श्रद्धेने नमस्कार करीत आहोत. पांडुरंगाचरणी महाराष्ट्र नेहमीच लीन झाला आहे. पांडुरंग महाराष्ट्राच्या मनात आहे.

भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपतील ‘उपऱयां’नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल. बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल.

कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करून मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले हे आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाडय़ाने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे. मंदिरांचे दरवाजे उघडा हे आंदोलन महाराष्ट्रात यापूर्वी झाले आहे. नाशकात काळाराम मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडा यासाठी साने गुरुजींनी केलेले आंदोलन अजरामर आहे. असेच ऐतिहासिक आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही केले होते. विदर्भात पंजाबराव देशमुखांनी असेच एक आंदोलन केले होते. मात्र त्या सर्व आंदोलनांमध्ये सामाजिक आशय होता. पण भाजपचे जे आंदोलन आता सुरू होते ते राजकीयच होते. मुळात गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरेच काय, सर्वच धर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती, ती जनतेच्या आरोग्यासाठी, जिवाचे रक्षण करण्यासाठी.

हा केंद्र सरकारचाच आदेश होता. जसजसे कोरोनाचे संकट निवळत गेले तसतसे एक-एक क्षेत्र उघडण्यात आले. हे सर्व केंद्राच्याच सूचनांनुसार घडत होते. त्यामुळे भाजपतील उपऱया व नाच्या हिंदुत्ववाद्यांना मंदिरे उघडा असे आंदोलन करायचे होते तर त्यांनी ते पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवे होते. दिल्लीतील जंतरमंतर रोड, रामलीला मैदान, विजय चौकात घंटा, थाळय़ा वाजवून मंदिरे उघडा असे आपल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींना सांगता आले असते, पण त्यांनी ढोल-ताशे वाजवले ते महाराष्ट्रात. हे तर बिनबुडाचेच राजकारण आहे. लोकांना भडकवून त्यांना जे साध्य करायचे आहे त्यामुळे नुकसान महाराष्ट्राचेच होत आहे. महाराष्ट्रात हळूहळू कोरोना निवळत आहे, पण कोरोनाची दुसरी लाट उसळण्याचा धोका कायम आहे. मंदिरे, बाजार, सार्वजनिक स्थळे यातूनच कोरोनाचे संक्रमण वाढणार असे तज्ञांना वाटते. पण वैद्यकीय सल्ले, तज्ञांचे मार्गदर्शन याची पर्वा करतील ते भाजपवाले कसले? दिल्लीत सर्वकाही घिसाडघाईत उघडले. त्याचा परिणाम तेथे कोरोनाची दुसरी लाट येण्यात झाला. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दुसऱया लॉक डाऊनचा निर्णय घेतला तर त्यात मंदिरे पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. उपऱया हिंदुत्ववाद्यांचा या प्रश्नी अभ्यास कच्चा आहेच.

शिवाय त्यांना आपल्या प्रजेची काळजी नाही. इंग्लंड, युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉक डाऊन का सुरू झाले, ते मंदिर उघडण्याचे नाचरे श्रेय घेणाऱयांनी समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची, देवधर्माची भूमी आहे. इथे अनेक संतांनी, देवांनी अवतार घेतले आहेत. मोगलांच्या आक्रमणांत जी मंदिरे उद्ध्वस्त झाली त्या मंदिरांचे पुनर्निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष भवानी मातेने प्रकट होऊन छत्रपती शिवरायांना हिंदूत रक्षणासाठी तलवार दिली आहे. देव मस्तकी लावणारा हा महाराष्ट्र आहे. 1992 च्या धर्मयुद्धात मंदिरे, देवांचे, हिंदुत्वाचे रक्षण करणारी शिवसेनाच होती याचा विसर उपऱया हिंदुत्ववाद्यांना पडला असेल, पण जनता मात्र काहीच विसरलेली नाही. महाराष्ट्रातील मंदिरे उघडली ती श्रींच्या इच्छेने. याच श्रींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रेरणा दिली. त्याच प्रेरणेतून हे राज्य चालत आहे. भारतीय जनता पक्षाचे मंदिर किंवा धर्मप्रेम कसे फसवे आहे ते पहा. मुंबादेवी, मुंबामाता हे मुंबईचे आराध्य दैवत. याच मुंबामातेवरून ‘मुंबई’ नाव पडले. त्या मुंबईचा अपमान करणाऱया ‘उपऱया’ नटीचा ‘जय जय’ करताना यांचे देवदेवतांचे प्रेम आणि श्रद्धा कोठे अडकल्या होत्या? आता ते ‘छटपूजे’स परवानगी मिळावी म्हणून राजकीय आंदोलन करीत आहेत.

छटपूजेस एरवी कधीच परवानगी नाकारली नाही, पण यानिमित्ताने समुद्रकिनारी जो प्रचंड जनसमुदाय जमा होतो तो कोरोना काळात योग्य आहे काय, याचा सारासार विचार करण्याची बुद्धी ते गमावून बसले आहेत. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ते अशा प्रकारची आंदोलने करून लोकांना संकटात ढकलत आहेत. हे क्रौर्यच म्हणायला हवे. हरयाणात घाईघाईने शाळा सुरू केल्या. तेथे पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. याचे भान महाराष्ट्रातील नाचऱया, उपऱया हिंदुत्ववाद्यांनी ठेवले तर मेहेरबानी होईल. एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱया’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱयांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱया हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल. त्यांच्या मानेवर रिकामी मडकी आहेत, पण मडकी बनविणाऱया पांडुरंगभक्त गोरा कुंभाराच्या वंशजांनाही आम्ही श्रद्धेने नमस्कार करीत आहोत. पांडुरंगाचरणी महाराष्ट्र नेहमीच लीन झाला आहे. पांडुरंग महाराष्ट्राच्या मनात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जामीन मिळताच राजे समर्थकांचा रुग्णालयात धिंगाणा

swarit

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

News Desk

मी राज्यपालांना वाकून नमस्कार केला कारण .. राऊतांनी सांगितलं सत्य !

Arati More