मुंबई। नागरिकांना कोरोना विषाणूनेतर हैराण केलंच आहे परंतु महागाईनेही लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. असंच महागाईवर स्पष्ट मत आणि विरोधकांवर टीका त्यांनी सामना अग्रलेखातून केली आहे. : देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था आणि सतत होणारी महागाई याबाबत प्रश्न अनेक असले तरी त्याचे उत्तर एकच आहे, पण ते देणे केंद्र सरकारला राजकीयदृष्ट्या सोयीचे नाही. आधीच कोरोना आणि लॉक डाऊनचा मार; त्यात दरवाढीचा भडीमार अशा ‘चक्रव्यूहा’त देशातील सामान्य जनता सध्या फसली आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
महागाईचे प्रमाण मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत
कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण आपल्या देशात कमी होत असले तरी महागाईचे प्रमाण मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट दिवसेंदिवस ती वाढतच आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहेच, आता विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सोमवार मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 859.50 रुपये एवढी असेल. काही शहरांमध्ये हीच किंमत 897 रुपयांपर्यंत वाढली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमतही 68 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे त्या प्रकारातील 19 किलोचे एलपीजी सिलिंडर आता 1618 रुपयांना मिळेल. म्हणजे घरगुती गॅसही महाग आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने विकत घ्यायच्या खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होणार, असा दुहेरी मार सामान्य माणसाला खावा लागणार आहे.
सरकार आंतरराष्ट्रीय किमतींकडे बोट दाखवून हात झटकते
अर्थात, हे काही नवीन नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीचा सिलसिला सुरु आहे. घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमत जानेवारी 2021 मध्ये 694 रुपये होती. फेब्रुवारीमध्ये ती 719 रुपये झाली. मार्च महिन्यात ती 819 रुपये, तर आता थेट 859.50 रुपये एवढी झाली आहे. म्हणजे या वर्षभरात घरगुती गॅसचे एक सिलिंडर तब्बल 165 रुपयांनी महाग झाले आहे. पुन्हा या महागाईबद्दल सरकारकडे बोट दाखवायचीही सोय नाही. कारण सरकार लगेच पेट्रोलियम कंपन्या आणि तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींकडे बोट दाखवून हात झटकते.
महागाईमध्येही पूर्वीची सरकारेच दिसत आहेत
2014 पूर्वी जे या महागाईविरोधात त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारत होते, तेच मागील सहा वर्षांपासून केंद्रात सत्ताधारी आहेत. अर्थात, केंद्रातील सत्ताधारी महागाईबाबत सोयिस्कर मौन बाळगून असले तरी त्या पक्षाच्या काही मंडळींना मात्र या महागाईमध्येही पूर्वीची सरकारेच दिसत आहेत. मध्य प्रदेशमधील एका भाजप नेत्याने तर सध्याच्या महागाईचे खापर थेट पं. नेहरुंवर फोडले. पं. नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून जे भाषण केले होते, त्यातील ‘चुकां’मुळे सध्याची महागाई निर्माण झाली, असे तारे त्यांनी तोडले. विद्यमान केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली, असेही ते म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.