HW News Marathi
देश / विदेश

“विरोधकांवर बरसण्याची व गरजण्याची संधी पंतप्रधानांनी का घेतली नाही?”

नवी दिल्ली | संसदेत झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण आता पेटलंय. विरोधाचा देखील पारा चढला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या रोकठोक स्वभावासाठी लोकप्रिय आहेत. विरोधकांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा संसदेत उपस्थित केला हे काय बेफाम आणि मर्यादाभंगाचे वर्तन झाले? सरकारने चार तासांची चर्चा घडवून या विषयाला मूठमाती द्यायला हवी होती, पण सरकार चर्चेपासून पळून गेले. हाच संसदीय मर्यादेचा भंग आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. संसदेच्या अधिवेशनात मर्यादांचा भंग झालाच असेल तर त्यास सरकारचा आडमुठेपणा, संसदेस न जुमानण्याची विकृती जबाबदार आहे. ब्रिटिश काळात वीर सावरकर, गांधीजी, नेहरू, भगत सिंग, मदनलाल धिंग्रा हेसुद्धा मर्यादाभंग करीत आहेत असे त्या जुलमी ब्रिटिश सरकारला वाटत होते.या इतिहासाचे संशोधन करून संसदेतील शहाणे लोक बेफाम का होतात? याची कारणे केंद्र सरकारच्या अष्टप्रधानांनी शोधायची आहेत अशी भूमिका शिवसेनेने सामना संपादकीयमधून मांडली आहे.

काय आहे अग्रलेख?

“संसदीय मर्यादा वगैरेंवर केंद्र सरकारचे आठ मंत्री गुरुवारी दिल्लीत प्रवचन देऊन गेले. संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी रात्री ज्या घाईगडबडीत आणि प्रचंड गोंधळात संपविण्यात आले त्या वेळी कोणत्या संसदीय मर्यादांचे पालन करण्यात आले? मंगळवारी आणि बुधवारी राज्यसभेत गोंधळ झाला. हा गोंधळ आपल्या लोकशाही परंपरेस शोभणारा नाही, पण हाती सत्ता आहे म्हणून अशा गोंधळाचे खापर फक्त विरोधी पक्षांवर फोडून सरकारला पळता येणार नाही. मंगळवारी, बुधवारी संसदेत ‘मार्शल’ची फौज बोलवावी लागली. त्या मार्शल मंडळींबरोबर सभागृहात खासदारांची झटापट झाली. यावर ‘विरोधकांनी संसद आणि लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन केले. या बेफाम वर्तनाबद्दल कठोर शिक्षा दिली जावी. जेणेकरून असे करणाऱयांना शंभर वेळा विचार करावा लागेल,’ असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, मुख्तार नक्वी, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, अर्जुन मेदवाला, व्ही. मुरलीधरन या अष्टप्रधानांचे म्हणणे आहे. या अष्टप्रधान मंडळाने अशी पत्रकार परिषद घेऊन बेफाम आरोप करण्यापेक्षा विरोधी पक्षाने लोकशाही मार्गाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना समोरासमोर, संसदेच्या सभागृहात उत्तरे दिली असती तर बरे झाले असते. पण सरकार संसदेतून पळून गेले. त्यामुळेच गोंधळाची स्थिती निर्माण झाली,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

इकडली थुंकी तिकडे

संजय राऊत यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. “मुळात सरकारचे अष्टप्रधान मंडळ धादांत खोटे बोलत आहे. ‘सरकार महागाई, कोरोना संकट, कृषी कायद्यांवर चर्चेला तयार होते, परंतु विरोधी पक्षच चर्चेला तयार नव्हते,’ असे विधान म्हणजे खोटेपणाचा कळस आहे. राज्यसभेत कोरोना संकटावरील चर्चा अत्यंत शांततेत व गांभीर्याने पार पडली. कृषी मुद्दय़ांवर सरकार चर्चेला तयार होते, असे आता सांगणे म्हणजे इकडली थुंकी तिकडे करण्यासारखे आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

बोट दाखवताना उरलेली बोटे तुमच्याकडे वळली

“विरोधकांकडे बोट दाखवताना उरलेली बोटे तुमच्याकडे वळली आहेत हे विसरू नका. संसदेत राष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा होणार नसेल तर काय राज्यकर्त्यांच्या नावाने सभागृहात भजन-कीर्तनाच्या झांजा वाजवायच्या? संसद काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री किती काळ संसदेत आले व प्रश्नांना उत्तरे दिली, ते अष्टप्रधानांनी जाहीर करावे. पेगॅसस प्रकरणात विरोधकांवर बरसण्याची व गरजण्याची संधी गृहमंत्री व पंतप्रधानांना होतीच. ती त्यांनी का घेतली नाही?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

संसदीय मर्यादेचा भंग

“पेगॅसस एक हत्यार आहे व त्याचा प्रयोग देशातले पत्रकार, लेखक, नेते आणि न्यायमूर्तींवर करण्यात आला आहे. इस्त्रायलची ‘एनएसओ’ कंपनी त्यांचे पेगॅसस स्पायवेअर फक्त अधिकृत सरकारलाच विकते. जर हिंदुस्थान सरकारने पेगॅसस खरेदी केले नाही, मग कोणत्या परक्या सरकारने हिंदुस्थानींवर पाळत ठेवण्यासाठी असंख्य लोकांच्या मोबाईलमध्ये पेगॅसस स्पायवेअर इन्स्टॉल केले? या राष्ट्रहिताच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. विरोधक रोज या विषयावर चर्चा मागत होते. त्यात त्यांचे काय चुकले? विरोधकांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा संसदेत उपस्थित केला हे काय बेफाम आणि मर्यादाभंगाचे वर्तन झाले? सरकारने चार तासांची चर्चा घडवून या विषयाला मूठमाती द्यायला हवी होती, पण सरकार चर्चेपासून पळून गेले. हाच संसदीय मर्यादेचा भंग आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार

Aprna

शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल

News Desk

ममता बॅनर्जी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

News Desk