मुंबई | वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनानिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला होता. बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं म्हणत “आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं,” असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला होता. अमित शाह यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्याला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,” असा पलटवार शिवसेनेनं शाह यांच्यावर आजच्या (९ फेब्रुवारी) सामना अग्रलेखातून केला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले आहे. त्यांना शुभेच्छा व मानसिक शांततेसाठी प्रार्थनेचे बळ देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो ? महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले व सुरूच आहेत , ते नाकाम होतील . या प्रयत्नांत घटनात्मक पदावरील राज्यपालांची अप्रतिष्ठा केली गेली . महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत . या सर्व प्रकारात तुमचेच वस्त्रहरण झाले आहे . कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले . तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत , तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !
देशातील सर्व प्रश्नांचा निचरा झाल्यामुळे गृहमंत्री श्री. अमितभाई शहा हे रविवारी कोकण प्रांतात पायधूळ झाडून गेले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र भाजपातील एकजात सर्व मूळ पुरुष तसेच बाटगे मंडळ उपस्थित होते. अमितभाई हे बऱ्याच कालखंडानंतर महाराष्ट्रात अवतरल्याने ते काय बोलतात, काय करतात याकडे लोकांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी धुरळा उडवला, पण त्यांचे विमान पुन्हा दिल्लीत उतरण्याआधीच धुरळा खाली बसला आहे. श्री. शहा नवीन असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी तोच कोळसा उगाळून काय साधले? त्यांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने आले आहे, सरकार तीनचाकी आहे वगैरे वगैरे.
बंद खोलीत आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. दुसरे म्हणजे आपण जे करतो ते ‘डंके की चोट’पर करतो. बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहीत नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. बरे, बंद खोलीचे रहस्य याआधी भाजप पुढाऱ्यांनी अनेकदा मांडले आहे. अनेक ‘बैठय़ा’ मुलाखतीत श्री. शहा यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘बंद खोलीत काय घडले हे बाहेर सांगणे हा आपला संस्कार नाही.’’ मग आता कोकणच्या ‘जगबुडी’ नदीत त्या संस्काराचे विसर्जन का झाले? हे सर्व लोक या पद्धतीने ‘उचकले’ आहेत याचे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य! भाजपच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे. ज्या वैद्यकीय कॉलेजचे उद्घाटन काल झाले, त्यात या आजारावर उपचार होतात काय ते पाहावे लागेल, पण महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे.
त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे. श्री. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही. अमित शहा यांच्यात व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती. आम्ही लपूनछपून काळोखात काही करत नाही, असे कोकणात सांगितले गेले. त्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील. श्री. फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतोय, पण ठीक आहे.
धुरळा उडवायचा म्हटल्यावर या अशा उडवाउडवीकडे दुर्लक्ष करायला हवे. देशासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत व देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. कोकणातील सभेत धुरळा उडवत असताना तिकडे उत्तराखंडात जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली. गावेच्या गावे वाहून गेली. गृहखात्याने तेथे खास लक्ष देणे गरजेचे आहे. लाखो शेतकरी पुढच्या सहा महिन्यांचा शिधा घेऊन दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांचे प्रश्न अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे सोडविण्याची गरज आहे. भाजपच्या नात्या-गोत्यातील कुणीएक दीप सिध्दू शेतकऱ्यांची झुंड घेऊन लाल किल्ल्यावर घुसला व तिरंग्याचा अपमान केला. त्याच्यावर कारवाई होत नाही. 370 कलम उडवूनही कश्मीरात पंडितांची घरवापसी झाली नाही. देशातील अनेक भागांत अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न उफाळून आले आहेत. भाजपपुरस्कृत एका ‘टी.व्ही.’ अँकरने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती फोडून राष्ट्रद्रोहासारखा अपराध केला. त्यावरसुद्धा ‘डंके की चोट’पर कारवाई शिल्लक आहे. गृहमंत्र्यांनी आता अशा राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवले तर बरे.
नाहीतर राजकीय धुरळा उडविण्यात वेळ निघून जाईल व देश खड्यात पडेल. केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोकणातील धुरळय़ात आणखी एक उडवाउडवी केली. आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. उलट शिवसेना तुमच्या वाटेने जात राहिली असती तर आजचा सुवर्ण कळस कधीच दिसला नसता. परमेश्वराची कृपा म्हणून भाजपला शब्द फिरविण्याची दुर्बुद्धी सुचली व शिवसेनेस हे ‘अच्छे दिन’ दिसले. त्याबद्दल महाराष्ट्राची जनता श्री. अमितभाई शहा यांची सदैव ऋ=णी राहील. पंचवीस वर्षे युतीत सडली असे श्री. उद्धव ठाकरे म्हणाले ते सत्य होते.
यावर शिवसेनेच्या सद्यस्थितीने शिक्कामोर्तबच केले. शिवसेनेने आपला मार्ग निवडला तसा अकाली दलानेही निवडला. हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अस्तित्वाचे खांब होते. अनेक वादळांत या खांबांनी भाजपचा डोलारा व प्रतिष्ठा टिकवून ठेवली होती. एकामागून एक असे जुने साथी आपल्याला का सोडून गेले यावर भाजप नेतृत्वाने विचारांचा धुरळा उडवला तर बरे होईल, पण स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले आहे. त्यांना शुभेच्छा व मानसिक शांततेसाठी प्रार्थनेचे बळ देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो?
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले व सुरूच आहेत, ते नाकाम होतील. या प्रयत्नांत घटनात्मक पदावरील राज्यपालांची अप्रतिष्ठा केली गेली. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. या सर्व प्रकारात तुमचेच वस्त्रहरण झाले आहे. कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले. तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.