मुंबई |आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. २००० झाडांची सामुदायिक कत्तल फडणवीस सरकारने केली होती. तेव्हा अहंकार बाजुला ठेऊन पर्यावरण प्रेमींच्या मागणीचा मान राखला असता तर काय बिघडले असते, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी सरळ केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली. पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रातील वृक्ष, वेली, नद्या, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, कडेकपारी आज आनंदाने बहरून निघाली असतील. हा आनंद चिरकाल टिको!
मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले, ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील. पर्यावरणप्रेमींना सुखावणारा हा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाचे प्रचंड कौतुक सध्या होत आहे. मुंबईसारख्या शहराला प्राणवायू पुरवणारे आरेचे जंगल हे सव्वा कोटी लोकसंख्येचे फुफ्फुस आहे. या फुफ्फुसावर हल्ला केला असता तर मुंबईचा श्वास गुदमरला असता. जंगले, झाडे, नद्या, समुद्र, आदिवासी वाचवायला हवेत असे नुसते बोलून भागत नाही. निसर्ग मारून विकासाची वीट रचता येणार नाही. विदर्भातील विकासातला सगळय़ात मोठा अडसर म्हणजे तेथील झुडपी जंगले. त्या झुडपी जंगलांबाबत निर्णय न घेणारे आरेतील जंगलतोडीसाठी एका रात्रीत निर्णय घेतात.
दोन हजारांवर झाडे कापली जातात. त्या झाडांवरील पक्ष्यांची घरटी, त्यांची पिले तडफडून मारली जातात व या अमानुषतेविरुद्ध आवाज उठवणाऱयांना अटक केली जाते. हे प्रकार जंगलराजला लाजवणारेच होते. आता आरेतील ‘कारशेड’ कांजूरमार्गला हलवली यावर भाजपसारख्या विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे. श्री. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘‘हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे’’. श्री. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? फडणवीस सरकारने अहंकार बाजूला ठेवून पर्यावरणप्रेमींचा मान राखला असता आणि जंगलातील कारशेड कांजूरला आधीच नेली असती तर काय बिघडले असते? पण त्या वेळीसुद्धा अहंकार आडवा आला. विरोधकांचे म्हणणे असे की, कारशेड आरेतून कांजूरला नेल्यास चार हजार कोटींचा जादा भुर्दंड सोसावा लागेल.
प्रत्येकाचे आकडे वेगळे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली माहिती अगदी वेगळी आहे. कांजूरला कारशेड उभारताना सरकारला खर्च येणार नाही. कांजूरची जागा सरकारचीच आहे. त्यामुळे त्या जमिनीसाठी एक छदामही मोजावा लागणार नाही. पुन्हा ‘आरे’त जी इमारत वगैरे उभी केली आहे असे सांगतात ती इमारत इतर सरकारी कार्यासाठी वापरली जाईल. सरकारने यापूर्वी आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता 800 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. जगात सर्वत्र जंगलांवर अतिक्रमण सुरू असताना जंगलांची व्याप्ती वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. निसर्गप्रेमींसाठी हा निर्णय आशादायक आहे. आरे प्रकरणात पर्यावरणपेमींचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी केले होते. तेव्हा ते मंत्रिमंडळात नव्हते.
आज ते राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत. त्यामुळे ‘आरे’चे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री कोणती पावले उचलणार, असे प्रश्न विचारले गेले; पण ‘ठाकरे’ शब्दाला पक्के असतात. देश आणि राज्याच्या हिताच्या प्रश्नी ते कोणतीही तडजोड करीत नाहीत हे या निर्णयाने स्पष्टच झाले. सर्वत्र निसर्गाचा ऱहास सुरू झाला आहे. डोंगर कापले जात आहेत. झाडे तोडली जात आहेत. नद्या, नाले, समुद्र भराव टाकून व्यापार केला जात आहे. वाळूचा बेकायदा उपसा हा चिंतेचा विषय ठरत आहे.
गंगा शुध्दीकरण हा श्रद्धेचा तितकाच पर्यावरणाशी निगडित विषय आहे. गंगा शुद्धीकरणासाठी जपान सरकारची मदत घेतली जात आहे. निसर्गाचे आपण देणे लागतो, असे यावर पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे व ते योग्यच आहे. मात्र मुंबईतील जंगलतोड करून आपण काय मिळवले, यावर कोणाकडे उत्तर नाही. शहराच्या मध्यभागी एक जंगल असणे ही मुंबईसाठी भल्याची गोष्ट आहे. ते असे उद्ध्वस्त करणे हे क्रौर्यच आहे. हवामान बदलाच्या संकटाने जगासमोर संकट निर्माण झाले. ते माणसाने निसर्गाशी वैर निर्माण केल्यामुळेच झाले. ‘मेट्रो’ कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरच्या सपाट मैदानावर नेली यावर विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही. जंगल वाचवणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही. म्हणून आरे आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यायचे ठरवले आहे.
राजकीय गुन्हे अनेकदा मागे घेतले जातात; पण पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱयांना आजन्म गुन्हेगार ठरवले जाते. खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी सरळ केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱयांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली. पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रातील वृक्ष, वेली, नद्या, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, कडेकपारी आज आनंदाने बहरून निघाली असतील. हा आनंद चिरकाल टिको!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.