HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार ते अनिल देशमुख ! महाविकासआघाडीच्या या नेत्यांची केलीय Ed, CBI ने कोंडी

मुंबई | शिवसेनेने भाजपशी युती सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा हात धरला. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हे सरकार स्थापन झाल्यापासूनच ते पडणार अशी भाकीतं केली होती. सरकारमधील मंत्र्यांनी हे सरकार स्थिर असणार असा दावा केला होता. इतकंच नाही तर भाजप पुढील ५ वर्ष विरोधक म्हणूनच राहणार असा टोलाही लगावला होता.

अशा अनेक आरोप प्रत्यारोपानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केले.या सगळ्या प्रकरणात अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आता तर सीबीआयने थेट अनिल देशमुख यांच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी केली आहे. महाविकासआघाडी सरकारमधल्या अशाच काही नेत्यांबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांत छापेमारी करण्यात आली आणि ज्यांना ईडी,सीबीआय अशा चौकशींना सामोरं जावं लागलं.

हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. २५ जुलै २०१९ रोजी आयकर विभागाची टीम मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाली होती. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांवर देखील छापा टाकल्याची माहिती होती. या छापेमारीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मुश्रीफ यांच्या पुण्यातील दोन घरांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. मुश्रीफ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भाजपात प्रवेशाची ‘ऑफर’ नाकारल्यानंतर आठ दिवसांतच झालेल्या या कारवाईने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं… आणि हसन मुश्रीफ यांनी या आवाहनाला धुडकावून लावलं होतं साहेब आमचा देव ..म्हणत त्यावेळी अनेक महिलांची मोर्चा काढून मुश्रीफांवरील कारवाईमुळे भाजपचा निषेध केला होता.

प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि यांचे पुत्र विहंग सरनाईक हे ईडीच्या निशाण्यावर होतेच सोबत प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांना देखील ईडीकडून नोटीस धाडण्यात आली होती. ईडीकडून २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरासह, विंहग आणि पूर्वेश यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकण्यात आली होती. त्या धाडीमध्ये ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे सांगण्यात येत होते. प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी झाली त्यावेळी स्वतः प्रताप सरनाईक हे देशाबाहेर होते. प्रताप आणि विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशी करता ताब्यात घेतले होते. त्यावेळी जवळपास ४ ते ५ तास चौकशी झाली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.

अनिल देशमुख, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक (संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे), निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे दोन चालक, बार मालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली.अनिल देशमुख यांची सुद्धा चौकशी झाली आणि आता अनिल देशमुख यांच्या घरावर कार्यालयावर छापे मारण्यात आले तसेच तच्यांवर गुन्हा दाखल झाला त्यामुळे अटक हो याची शक्यता बळावली आहे.

चौकशी कोणाकोणाची?

एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली.खडसे यांना नोटीस बजावण्यामागे भाजपचा हात आहे. ही एकप्रकारे भाजपची हुकूमशाही असून याला खडसे भक्कमपणे तोंड देतील. भाजपच्या ईडीला खडसे सीडी लावून उत्तर देतील, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सांगितले. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

२५ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचलकांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार स्वत:हून २७ सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर राहणार होते. मुंबईत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र, आता चौकशीला येण्याची गरज नसल्याचे ईडीने स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील या नेत्यांवर छापेमारी करण्यात आली, चौकशी झाली. अनिल देशमुख यांच्यावर पुढे काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकारमधील कोणत्या नेत्याची चौकशी होणार? काय घडामोडी घडणार हे येत्या काळात पाहणे गरजेचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मेसेजकरून केली तब्येतीची विचारपूस

Aprna

निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासमध्ये उद्धव ठाकरेंची नोंद होईल; निलेश राणेंची जहरी टीका

Aprna

शिवसेनेला अजान प्रेम असताना,गीतापठण उपक्रम कौतूकास्पद,आशिष शेलारांचा टोला

News Desk