HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रवादी’ला विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शिष्टाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत विसंवादाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी महामंडळाचे वाटप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक आणि अन्य नेत्यांच्या विरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्ष निवडीचा आग्रह धरला जात आहे. त्यावर चर्चा झाली असली तरी पावसाळी अधिवेशनात ही निवड होणार नाही हे जणू काही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीला विश्‍वासात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या, अशी सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटीगाठीमुळे महाविकासआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असताना काल थेट शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शरद पवार हे ‘वर्षा’वर दाखल होण्यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील वर्षावर पोहोचले होते. मुंबईचे पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे हेही तेथे उपस्थित होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीचा आणि सीबीआय चौकशीचा फास आवळत चालला आहे. त्यांना काल ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. त्यांनी तब्येत आणि कोरोनाच्या कारणास्तव ऑनलाईन चौकशी करण्याची मागणी केली तसेच वेळही वाढवून मागितली. ईडीने जर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई केली तर त्यावर काय रणनीती आखावी यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. सोबतच परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आहेत.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीसाठीही भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या सगळ्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महामंडळाच्या वाटपावरही चर्चा झाली. पावसाळी अधिवेशन संपल्यावर महामंडळावरील नियुक्त्या जाहीर कराव्यात असे या चर्चेत ठरले. काही महामंडळावर एकमत झाले असले तरी महत्त्वाच्या महामंडळावर महाविकास आघाडीत मतभेद आहेत.

कार्यपद्धतीवर पवारांची नाराजी?

शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाने शंभर सदनिका टाटा रुग्णालयाला दिल्या होत्या. या सदनिकांच्या चाव्या शरद पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मागणीवरून तडकाफडकी बदलला. ही बाब राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. लॉकडाऊनबाबतही निर्णयातील धरसोडपणावर पवार नाराज आहेत. लॉकडाऊन कडक केल्याने व्यापारी वर्ग नाराज आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादीला विश्‍वासात घेऊन करावेत, असे पवारांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उध्दव ठाकरे तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, राणे पुत्रांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk

‘मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं’, शर्मिला ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

गडकरींच्या गावात भाजपचा पराभव ही आगामी पराभवाची नांदी !

swarit