HW News Marathi
Covid-19

आता गंगेत तरंगणारे हजारो मुडदेच सत्य बोलतायत ! संजय राऊतांची विखारी टीका

मुंबई । देशातील भीषण कोरोनास्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. “लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, ४०० जागा जिंकू”, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. तर “गंगेत जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत. गंगेत तरंगणाऱ्या या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला”, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी असे विधान केले होते की, “आताही निवडणूक घेतली तरीही मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील.” यावरच टीका करताना संजय राऊत म्हणतात. “लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत.” यावेळी संजय राऊत यांनी देशातील कोरोना मृत्यूंच्या आकड्यावरही भाष्य केले आहे.

आता गंगेत तरंगणारे हजारो मुडदेच सत्य बोलतायत !

“जिवंत माणसं खोटे बोलतील, पण मृत्युशय्येवरील माणूस सहसा खोटे बोलत नाही. पण आता तर गंगेत तरंगणारे, प्रवाहात वाहत येणारे हजारो मुडदेच सत्य बोलत आहेत. ‘होय, आम्ही कोरोनामुळे मेलो. आम्ही मेल्याचे आकडे लपवण्यात आले. आम्हाला जाळायला, पुरायलाही जागा नसल्याने गंगेच्या प्रवाहात आम्हाला सोडून दिले…” हा मुडद्यांचा आक्रोश आहे. त्यांचा आवाज कसा ऐकणार? प्रेते तरंगत आहेत. देश बुडत आहे. देशात आतापर्यंत २८० डॉक्टरांनी करोना संसर्गाने प्राण गमावले. महाराष्ट्रातील ६८ डॉक्टर्स त्यात आहेत. देशात दोन हजारांवर शिक्षक प्राणास मुकले. सर्वत्र हाहाकार माजला असताना आपल्या देशात काय चालले आहे? प. बंगालात CBIचे लोक घुसले व त्यांनी बेकायदेशीरपणे ममता सरकारातील २ मंत्री व २ आमदारांना अटक केली. करोना काळातील भयंकर संकटातही राजकारण थांबवले जात नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अटकेसाठी CBI सर्वत्र धाडी घालत आहे. या धाडसत्राने महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण होईल व सरकार पडेल, असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे.

मोदीजी, लस कुठे गेली?

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा, लसींच्या तुटवड्याचा मुद्दा गेल्या कित्येक दिवसांपासून देशात गाजत आहेत. यावर टीका संजय राऊत म्हणाले, “मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?’ अशी विचारणा करणारी पोस्टर्स दिल्लीच्या भिंतीवर कुणीतरी चिकटवली आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ गरीब मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. आता मुंबईत काँग्रेसने तीच पोस्टर्स उघडपणे लावली. देशात लसीचा तुटवडा आहे व लसीकरण थांबले आहे. भारत सगळ्यात मोठा ‘व्हॅक्सिन उत्पादक’ देश आहे. सरकारने १२ एप्रिलला ‘लस उत्सव’ साजरा केला, पण लसीचा ठणठणाट होता. गेल्या ३० दिवसांत लसीकरणात ८० टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या फॅक्टऱ्यांत जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी भारतातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे भारतात बनलेली ही लस आधी मोठ्या प्रमाणावर परदेशात पोहोचली व भारतात प्रेतांचे खच पडले”, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ६,३९७ नवे रूग्ण आढळले

News Desk