HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाविकासआघाडी हा आदर्श ! राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हायला हवे । संजय राऊत

मुंबई। देशात एकीकडे पश्चिम बंगालची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत अन्य प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून हे आवाहन केले आहे. दरम्यान, ममतादीदींच्या या आवाहनाला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे.

“महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासआघाडी हा एक आदर्श आहे. महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दाखवली आहे. नवा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हायला हवे अशी ममता बॅनर्जींची इच्छा असेल”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. आज (२ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या पत्रावर सर्वांनी विचार केला पाहिजे. एकत्र येणे आवश्यक आहे. सर्वांनी आता एकत्र आले पाहिजे. चर्चा करायला हवी. मला वाटते की सर्व एकत्र येतील”, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राने नवी दिशा दाखवली !

“राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचाराचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सरकार चालवत आहे. हे आदर्श सरकार आहे असे मी मानतो. अशाच प्रकारची आघाडी यूपीएकडून करण्यात यावी. ममता बॅनर्जी यांनी जवळ जवळ तशाच प्रकारच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राने नवी दिशा दाखवली आहे. ते राष्ट्रीय स्तरावर झाले पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले

लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे- शरद पवार यांच्यात चर्चा सुरू

“लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत मी काहीच बोलू शकत नाही. त्याचा निर्णय सरकार घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत बोलणं सुरू आहे”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Related posts

अमित शाह यांनी भारताच्या मुलीचा मान राखला, कंगनाने मानले आभार!

News Desk

वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ द्या!: विखे पाटील

News Desk

‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं दिसत आहे’, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला  

News Desk