मुंबई | एकीकडे आज वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळाला तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
मुंबईत जागोजागी शिवसैनिकांचं आंदोलन
मुंबई – आज मुंबईत शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला.
परभणीत शिवसेनेचा इंधन दरवाढी विरोधात मोर्चा
इंधन दरवाढी विरोधात परभणीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयावर दुचाकी ढकलत, सायकल चालवत शिवाय बैलगाडी घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
जालना- शिवसेनेकडून स्कुटीची अंत्ययात्रा
इंधन दरवाढी विरोधात आज जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शहरातील गांधी चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात दुचाकींची पेट्रोल दर वाढीमुळे आत्महत्या दाखवून तिची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या दरवाढीचा निषेध केला. दरम्यान मोदी सरकार गादीवर आल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून इंधन दर वाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी खोतकर यांनी केली.
शहापूर – पेट्रोल- डिझेल दरवाढ झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडी घेऊन शेकडो शिवसैनिकांसह मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली असून सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला आहे.
भिवंडीत तहसील कार्यालयाबाहेर निदर्शनं
इंधन दरवाढीविरोधात भिवंडीमध्ये शिवसेनेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधन दरवाढीची सर्व सामन्यांना प्रचंड झळ बसत आहे. केंद्र सरकार यावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला आहे. केंद्र सरकारने यावर वेळीच नियंत्रण आणावं अशी मागणी करत निदर्शने करण्यात आली. जर इंधन दरवाढ माघार घेतली नाही तर सेनेच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना दिलं आहे.
केंद्रसरकार हाय हाय ,मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा धडक मोर्चा काढण्यात आला. कोरोना संकटातून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. बेरोजगारी पराकोटीची वाढली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी महागाई गगनाला भिडलेली असल्याचा आरोप करत शिवसेनेने केंद्रसरकारच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
पुढची आंदोलन अजून तीव्र होतील- अनिल परब
मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या मंत्री अनिल परबांची केंद्र सरकारवर टिकेची झोड बनवली. ते म्हणाले की, आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. हा शिवसेनेचा पिंड आहे. अन्याय झाला, मुस्कटदाबी होते तेव्हा सेना उफाळून उठते. शिवसेना मनमानी मान्य करणार नाही. आजचा इशारा मोर्चा आहे. राज्य सरकार प्रश्न सोडवायला सक्षम आहे पण केंद्राचा वरवंटा फिरतोय . ते कुणाला जुमानत नाहीत. त्यांना हवे तसे दरवाढ करत आहेत. वर्षाला एसटी चालवायला 3 हजार कोटींचं डिझेल लागतं. या दरवाढीचं ओझं राज्य सरकार किंवा जनतेच्या खांद्यावर येतं. पुढची आंदोलन अजून तीव्र होतील, असं परब म्हणाले.
उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
इंधन दरवाडी विरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले जात आहे. आज उल्हासनगर येथे देखील शिवसनेकडून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. उल्हासनगरच्या महापौर लीलाताई आशान या बैलगाडीत स्वार होत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .यावेळी पवई चौक प्रांत कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.