HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणाची खाज शमली असेल तर देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही

मुंबई | चीनने लडाखच्या सीमेवर २० जवानांची हत्या केली. तो भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात व लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळय़ा माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण प्रश्नांवरची जळमटे काही निघत नाहीत अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. राजकारणाची खाज शमली असेल तर राजकारण्यांनी, मीडियाने आता देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

“देशातील तरुणवर्ग त्या धुंदीतून लवकरात लवकर बाहेर पडला तरच काही साधकबाधक सकारात्मक विचार करता येईल. राजकारणासाठी मर्तिकही चालते, पण पोटापाण्याच्या प्रश्नांना स्पर्श करायला कोणी तयार नाही. भारतीय जनता पक्षासाठी सध्या मैदान साफ आहे. त्या मैदानात भुकेकंगाल बेरोजगारांचे थडगे उभारू नका, इतकेच सांगणे आहे. रिया चक्रवर्तीपासून कंगनापर्यंत सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या लहानसहान, पोटापाण्याच्या प्रश्नांकडे पहा,” अशी विनंतीच शिवसेनेने केली आहे.

“राजकारणाची खाज शमली असेल तर राजकारण्यांनी, मीडियाने आता देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही. सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी तपास करून सत्यशोधनास आलेल्या सीबीआयचा तपासही संपत नाही, पण रिया चक्रवर्तीस अमली पदार्थांच्या एका प्रकरणात मात्र अटक झाली आहे. ठरविल्याप्रमाणे कंगना राणावतही मुंबईस आल्या व मुंबई पोलिसांच्याच कडेकोट बंदोबस्तात स्वगृही पोहोचल्या. त्यामुळे आता राष्ट्रहिताच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या, जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर सगळय़ांनीच लक्ष द्यायला हवे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“तिकडे हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवर संघर्ष सुरू आहे. चीनने लक्ष्मणरेषेचा भंग केला तर मुंहतोड कारवाई करण्याचे आदेश आपल्या कमांडर्सना देण्यात आले आहेत. चीन आमच्या हद्दीत घुसला आहे व इंचभरही मागे हटायला तयार नाही. हे लक्ष्मणरेषा तोडण्याचेच प्रयत्न नाहीत काय? मग आता आणखी कोणती लक्ष्मणरेषा तोडण्याची वाट आपण पाहत आहोत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“दोन्ही देशांचे सैनिक आरपार लढाईसाठी सज्ज आहेत व यावेळी चिनी सैन्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, हे सत्य आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 50 हजार सैन्य उभे केले आहे. शीन जियांग आणि तिबेटजवळच्या तळांवर दोनशेच्या आसपास लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. हिंदुस्थानी सैन्यानेही जोरदार तयारी केलीच आहे. पण सीमेवरील स्थिती चिंताजनक आहे तशी देशांतर्गत अवस्थाही चिंताजनकच आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अर्थव्यवस्था ढासळली. साफ मातीत गेली. रोजगारावर संकट आले. त्यातून देशभरात आत्महत्या करणाऱयांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱयांच्या आत्महत्यांमुळे देश आधीच चिंतेत होता. आता हातावर पोट असलेले, नोकरी-धंदा करणारे मध्यमवर्गीय आत्महत्या करीत आहेत. सुतार, प्लम्बर, वायरमन, छोटे दुकानदार, मोबाईल दुरुस्त करणारे, चर्मकार, रंगकाम करणारे, गवंडी वगैरे लोकांना सध्या काहीच काम नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“रेस्टॉरंटस् आणि रस्त्यावर अन्नपदार्थ विकणारे छोटे व्यवसायही बंद पडले. त्यातून अनेकांच्या चुली विझल्या. फेसबुक वगैरे कंपन्यांनी आपल्याकडील उद्योगपतींशी हातमिळवणी करून काही लाख कोटींची गुंतवणूक देशात केली. त्याचे कौतुक ज्यांना करायचे त्यांना करू द्या, पण त्यातून मजूरवर्गाच्या हातात काय येणार? विमानतळांची मालकी या अलाण्यांकडून त्या फलाण्यांकडे गेली. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाची तिजोरी फार तर गरम होईल, पण देशाची मृत अर्थव्यवस्था कशी जिवंत होईल?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“आत्मनिर्भर हिंदुस्थानची घोषणा रोमांचक आहे, पण आजही चीन आणि पाकिस्तानशी लढण्यासाठी आम्हाला राफेल विमानेच लागतात व संरक्षण उद्योगात परदेशी गुंतवणुकीसाठी लाल गालिचे अंथरून आपण बसलो आहोत. देशाला आर्थिक धोरण असे काही उरले आहे काय? घसरलेल्या अर्थचक्राचे खापर अर्थमंत्री देवावर फोडतात. म्हणजे सध्या आपला देश फक्त रामभरोसेच चालला आहे. रामावर भिस्त असणे चांगले. हा झाला श्रद्धेचा विषय, पण श्रीराम हे राजे असले तरी वनवासात त्यांनाही चूल पेटविण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतच होते.

भाजीपाला उगवून सीतामाईच्या रसोईत न्यावा लागत होता. आज आडातही नाही आणि पोहोऱयातही नाही. माणसांची चिंता कुणी करीत नाही. त्यामुळे राजकारण करणाऱयांना सामान्यजनांच्या प्रश्नांकडे जरा गांभीर्याने पाहा, असे सांगणे हा गुन्हा ठरत आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे,

“बिहारात निवडणुका जिंकायच्या आहेत. एका विशिष्ट जातीची मते एकगठ्ठा मिळवायची आहेत. म्हणून एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण आणि भांडवल कसे केले गेले, ते सगळय़ांनीच अनुभवले. त्याबाबत राष्ट्रीय आणि राजकीय धोरणे ठरविली जातात, पण लाखो-करोडो लोक बेरोजगार, गरीब झाले त्यावर मात्र धोरण ठरत नाही. एका नटीच्या बेताल वक्तव्याबाबत कमालीचा संवेदनशील होऊन मोठा वर्ग एकांगी राजकीय झोडपेगिरी करतो. त्यामागे राजकीय पक्षांचे पाठबळ उभे केले जाते. हे काही राष्ट्रहिताचे राजकारण नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला!

News Desk

शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवार!

News Desk

संकटाचा सामना करण्याचा सरकारला अनुभव – शरद पवार

News Desk