HW News Marathi
महाराष्ट्र

समाजप्रबोधनकार आणि लोकप्रतिनिधींनाच कोरोनाचा विसर

मुंबई | देशातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. तर ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होताना पाहायला मिळत आहे. अशातच बीडच्या नांदुरघाट या गावात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा नुकताच एक कार्यक्रम पार पडला. मात्र, त्यावरून आता इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किर्तनकार इंदुरीकर महाराज हे राज्यभरात किर्तन आयोजित करत असतात. नुकतंच त्यांनी बीडमध्ये किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्यांच्या या किर्तनाला हजारो लोक जमले होते. राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयानुसार सभा-कार्यक्रम आयोजित करणे यावर बंदी असताना देखील असे कार्यक्रम आयोजित करून इंदुरीकर महाराजांनी एक प्रकारे कोरोनाला आमंत्रणच दिलं असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यांच्या या कार्यक्रमावेळी सामाजिक अंतर आणि एकंदरीतच कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.

‘मी लस घेतली नाही, घेणार नाही’

यापूर्वीही इंदुरीकर महाराजांनी कोरोना लसीबाबत केलेल्या विधानाची राज्यभरात चर्चा होती. “मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही”, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. तर त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र टीका झाल्यानंतर अहमदनगर तालुक्यातील कौडगाव येथे ते कीर्तनासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘मी लस घेतली नाही, घेणार नाही असे म्हणालो होतो. याचा अर्थ इतर लोकांनी लस घेऊ नये, असे मी म्हटलेलं नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. तसेच, सोशल मीडियावर आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

‘मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही’

त्यानंतर आता तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी ‘मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही, पण ज्यांनी माळ काढली अशांना कोरोना गाठणारच,’ असे वक्तव्य त्यांनी आपल्या कीर्तनातून केलं होतं. ज्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तर त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तसेच इंदोरीकरांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही देसाई यांनी केला होता.

मनसेकडून कार्यक्रमाचे आयोजन

दरम्यान, आता इंदुरीकर महाराजांच्या बीड येथे झालेल्या किर्तनाला हजारोंचा जनसमुदाय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक नागरिकांनी मास्क सुद्धा लावला नव्हता. तर यावेळी नांदुरघाट पोलीस चौकीच्या नजीक बाजार तळावर जवळपास पाच ते सात हजार लोकांनी किर्तनासाठी गर्दी केली होती. मात्र, तरी सुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नाही, यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. यामुळे प्रशासन आणि सरकारकडून कोविड प्रतिंबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सुचना नागरिकांना केल्या जात आहेत. मात्र, असे असतानाच एका समाजप्रबोधनकारानेच या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करुन नियम पायदळी तुडवणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नेत्यांच्या घरच्या समारंभातच नियम धाब्यावर

तर फक्त इंदुरीकर महाराजच नाही तर लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांकडून सुद्धा वेळोवेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना पाहायला मिळतं. अनेक खासदार-आमदार अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तसेच आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या मुलामुलींचे मोठ्या थाटात विवाह सोहळे पार पाडले आहेत. यावेळी सुद्धा करोनाच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले आहे.

आरोग्यमंत्री देखील गर्दीच्या विळख्यात

सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका, असे आवाहन राज्य सरकारकडून सतत करण्यात येतं. तर राज्यात कोरोनाचा आलेख पुन्हा वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रचंड गर्दी झाली होती. तर या प्रसंगी राजेश टोपे देखील गर्दीच्या विळख्यात हरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोना निर्बंध हे फक्त सामान्य नागरिकांसाठीच असल्याचे पुन्हा दिसून आले.

पंतप्रधानांकडूनच नियमांचं उल्लंघन

दरम्यान, अशा नेतेमंडळींनीच जर नियम तोडले तर सामान्य जनतेला काय बोलणार असा सवाल देखील उपस्थित होतो. त्यात ही नेतेमंडळी सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहतातच पण यातले अनेकजण विनामास्क दिसून येतात. तर राष्ट्रीय स्तरावरही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह अनेक मंत्री आणि बडे नेते मोठ्या गर्दीच्या रॅलींमध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे बऱ्याचदा मोदींसह अनेक नेत्यांच्या तोंडावर मास्क देखील नसतो. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेलाच आहेत का? असा प्रश्न पडतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाघ ठरवतो मैत्री कधी करायची”, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk

#CoronaVirus : मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या दृष्टीने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit

एमएचटी-सीईटी परीक्षा १-२० ऑक्टोबरपर्यंत घेतली जाणार !

News Desk