HW News Marathi
महाराष्ट्र

‘कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत’ तर आता राऊतही गरजले!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानाचा थेट अर्थच सांगितला आहे. कुणी तरी आहे तिथे. त्यांना इथे यायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे. अनेकजण आमच्याकडे येऊ इच्छित आहे. त्यासाठीचं हे विधान होतं, असं सांगत संजय राऊत यांनी धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपमधील कोण नेते महाविकास आघाडीत येणार या विषयीचे तर्कवितर्क लढवले जात आहे.

चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये ते बोलले. नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचं आहे, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून आणि नाव घेऊन त्यांनी विधान केलं. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत… विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितलं त्या त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोकं येऊ इच्छित आहेत. येतीलच आता. चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा म्हणून. काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. उडवू द्या. पतंगवर जाते आणि कापली जाते. येईल नंतर खाली, असा चिमटा राऊत यांनी काढला.

महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे

आता काही होणार नाही आणि कोणी होऊ देणार. काही लोकांनी शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करणार असं भाजपचे काही लोक म्हणाले. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार? युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारला कोणताही धोका नाही

पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचं कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावंसं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतल्या नायर रुग्णालयात लसीकरणाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मुलेच मिळणं कठीण!

News Desk

बेस्टच्या २६ AC इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

News Desk