HW News Marathi
महाराष्ट्र

इरई नदीच्या खोलीकरणाचे काम त्वरित सुरू करा! – अजित पवार

चंद्रपूर । इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील इरई नदी व वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुंबई येथे आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, इरई नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामाकरिता विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा नियोजन समितीमधून डीझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून सदर मशीनद्वारे कामाला तात्काळ सुरवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी

इरई नदी ही शहरातून वाहत असून नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीच्या पात्रातील झाडे-झुडपे, अतिक्रमण, गाळ काढणे आणि खोलीकरणासाठी तर दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे आणि विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुराच्या प्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे पैसे देण्याची तरतूद आहे. ते त्वरित दिले जाईल. तर गॅबियन बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत पालकमंत्री म्हणाले, वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर असलेले वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर आधारीत या तीर्थक्षेत्राचा विकास होणार असून त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल. वढा तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाच्या याप्रकल्पासाठी 44 कोटी रुपये प्रस्तावित आहे. दोन वर्षात 25 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यास उर्वरीत निधी खनीज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल. वढा येथे साक्षात ‘प्रति पंढरी’ साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

नदीच्या संपूर्ण लांबीमधील स्वच्छता व खोलीकरणासाठी (17 किमी.) अंदाजित 25 कोटी, नदीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमीपर्यंत नदीतट विकास व सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे अंदाजित किंमत 200 कोटी, दाताळा पुलाखालील भागात 228 मीटर लांबीच्या बंधा-याचे बांधकाम अंदाजित किंमत 20 कोटी, नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील सहा किलोमीटर संरक्षक आधार भिंत व माती भिंतीच्या बांधकामाकरीता अंदाजित 320 कोटी व इतर करावयाची कामे 7 कोटी असे एकूण अंदाजित 572 कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती अधिक्षक अभियंता (पाटबंधारे) पद्माकर पाटील यांनी दिली.

बैठकीला व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे (सा.बा.विभाग), पद्माकर पाटील (पाटबंधारे विभाग), जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, कुंभे, उपविभागीय अभियंता दि.ना. मदनकर आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्राती साजरी करा, वाण म्हणून आरोग्यपूरक वस्तू द्या

News Desk

प्रजासत्ताक दिनी सजली विठुरायाची पंढरी

News Desk

शरद पवारांनी जे पेरले तेच उगवले आहे !

News Desk