HW News Marathi
Covid-19

पुण्यातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये १० ते १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा !

पुणे | पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी १० मे ते १७ मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली.

पुणे जिल्‍ह्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेऊन उपमुख्‍यमंत्री पवार यांनी काल (८ मे) विधानभवनातील (कौन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्‍ये बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या संचालक डॉ.अर्चना पाटील, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ.मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांच्‍यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्‍यमंत्री म्‍हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग या सर्वांनी समन्‍वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍याबरोबरच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्‍हा प्रशासनावर येणार आहे. यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय राखून नियोजनबद्ध काम करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. कोरोना रोखण्‍याच्‍या कामाला गती यावी यासाठी महसूल विभागातील वरिष्‍ठ अधिकारी डॉ.नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

परराज्‍यातील जे मजूर आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छित असतील त्‍यांना रेल्‍वेने पाठविण्‍याचे नियोजन करण्‍यात यावे, असे सांगून उपमुख्‍यमंत्री पवार यांनी या मजुरांच्‍या प्रवासाचा खर्च राज्‍य शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) करण्‍यात येईल, असे सांगितले. शहरातील ज्‍या भागात कोरोना बाधित रुग्‍ण अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येवू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्‍यमंत्री पवार यांनी दिले. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर तीही मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्‍हणाले, पुणे महापालिकेच्‍यावतीने ७० हजार कुटुंबाना शिधा देण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. तसेच मास्‍क, सॅनिटायझर्सचे वाटप करण्‍यात येत आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्‍यात येत आहे.

विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर यांनी पुणे विभागात ८३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ८८५ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण १ हजार ८९१ असल्याची माहिती दिली. विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सोलापूर जिल्‍ह्याचा दौरा करुन संबंधित विभागांना आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना दिल्‍याचे सांगितले. सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्‍याने उद्या सातारा जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व अधिकारी परस्‍पर समन्‍वयाने काम करत असून लवकरच कोरोना संसर्ग रोखण्‍यात यश येईल, अशी आशा व्‍यक्‍त केली. दुकाने उघडणे, नागरिकांना पेट्रोल-डिझेल उपलब्‍ध होणे याबाबत स्‍वयंस्‍पष्‍ट सूचना देण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. परराज्‍यात तसेच पुणे जिल्‍ह्याच्‍या बाहेर दुसऱ्या जिल्‍ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्‍या सोयीसाठी आवश्‍यक ते उपाय योजल्याचेही त्‍यांनी सांगितले.

पुणे महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी कंटेंन्मेंट भागात महानगरपालिकेच्यावतीने घेण्‍यात येत असलेल्‍या खबरदारीची माहिती दिली. कोरोनाचे रुग्‍ण जास्‍त आढळून आलेल्‍या वस्‍तीजवळ 5 स्‍वॅब सेंटर सुरु करण्‍यात आले. याशिवाय 6 मोबाईल स्‍वॅब युनिटही सुरु करण्‍यात आले आहेत. सार्वजनिक शौचालयांची नियमित स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. आरोग्य सेवेवरील ताण कमी करण्‍यासाठी 200 डॉक्‍टरांच्‍या भरतीची प्रक्रिया उद्यापर्यंत पूर्ण होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी जीवनावश्‍यक व बिगर जीवनावश्‍यक वस्‍तूंची दुकाने शासनाच्‍या निर्देशानुसार सुरु केल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी महापालिकेच्‍या वतीने आवश्‍यक त्‍या सर्व उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ.मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांनीही त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आलेल्या जबाबदारीबाबत तसेच करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहूल गांधी यांना कोरोनाची लागण

News Desk

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

Aprna

महाराष्ट्राने लसीकरणाचा वेग दुप्पट करावा, प्रकाश जावडेकरांची विनंती

News Desk