मुंबई | महाविकास आघाडी सरकार विरोधात विरोधी पक्ष नेहमीच टीका करत असतं. आता यामध्ये आणखी एका जुन्याच मुद्द्याची नव्याने भर पडल्याचे दिसत आहे. तो म्हणजे विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा. कारण, यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती. यावरून आता पुन्हा एकदा भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवरून टिप्पणी केली आहे.
स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे
“दोन दिवसांचं अधिवेशन होतं. कधी सुरू होतं आणि कधी संपतं, असं स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे. कारण कोरना विषाणूने सांगितलेलं आहे, की आमचा हल्ला मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर. या दोनच मंदिरांवर आम्ही हल्ला करणार आहोत. त्यामुळे आम्ही मंदिरं बंद ठेवतो आणि अधिवेशनाचं लोकशाहीचं मंदिर बंद ठेवतो. बाकी आम्ही सगळं सुरू ठेवतो कारण, करोना विषाणू सांगतो की आम्ही बिअर बारमध्ये हल्ला करणार नाही. नवीन काही आमच्याकडे संशोधक आले आहेत. तर, आता राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे.” असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य आहे..! @BJP4Maharashtra pic.twitter.com/uqwKW6FQ10
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 2, 2021
काय चर्चा झाली?
राज्यपाल भागत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अजित पवार यांनी या भेटीबादल खुलासा केला आहे. राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांच्या सोबत पावसासंदर्भात बातचीत झाली आणि राज्यपालांना १२ आमदारांविषयी निर्णय घेण्याचा विनंती केली, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल
सुधीर मुनगंटीवार आणि ३० पेक्षा जास्त पक्ष कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार व भाजपा कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर मोठ्यासंख्येने जमले होते, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.