मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सभागृहात विरोधी पक्षाकडून सरकारला धारेवर धरलं जात आहे.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना भर सभागृहात तुम्ही सीएम मटेरियल असल्याचं सांगितलं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालदेखील सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरुन प्रश्न आणि शंका उपस्थित करुन महाविकासआघाडीच्या नेत्यांना भंडावून सोडलं होतं. त्यानंतर मंगळवारी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात शिवसेनेच्या दिशेने बॉल टाकला आहे.यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
जवळपास १५ महिने उलटून या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले की, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची (सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही गदारोळाने झाली. वीजबील वाढ आणि वीज कनेक्शन तोडण्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाचं कामकाज गदारोळात सुरु झालं. त्यादरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा वार्षिक २०१७-१८ अहवाल सभागृहासमोर मांडला होता. याशिवाय त्यांनी त्यांच्या विभागाचे विविध अहवालही पटलावर ठेवले.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारं वक्तव्य केलं होतं. वसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता.