HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

मुंबई | कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ( १७ जानेवारी ) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोविडसंसर्ग स्थितीमुळे ऑनलाईन स्वरुपात आयोजित या समारंभास मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहूल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) एन. चंद्रशेखर, जी दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, एम पश्चिम विभागातील नगरसेवक श्रीकांत शेटये, नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका श्रीमती अंजली नाईक, तसेच महानगरपालिका उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ ५) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त सर्वश्री. विश्वास मोटे, शरद उघडे, पृथ्वीराज चौहाण, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) कृष्णा पेरेकर, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल ठाकरे यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर संबोधित करताना म्हणाल्या की, माहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्या, मात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जाते, असे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नये, असेही महापौरांनी नमूद केले.

खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. महापौर व महानगरपालिका आयुक्तांची टीम ही सर्वोत्कृष्ट कार्य करीत आहे. प्रत्येक निर्णय घेताना दूरदृष्टीने कामकाज केले जात असून मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदय देखील त्यावर लक्ष केंद्रीत करत असतात, असा उल्लेखही सावंत यांनी केला.

खासदार राहूल शेवाळे मनोगतात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिका अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातील बीपीसीएल, आरसीएफ, एचपीसीएल, इंडियन ऑईल अशा सर्वच कंपन्यांनी कोविड व्यवस्थापन व प्राणवायू पुरवठ्यासाठी मोठी मदत केली आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही शेवाळे यांनी केला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण ‘वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीही, कोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहे, यातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होते, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संगणकीय सादरीकरणासह प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलेंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या, अवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारले, माहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले, याचा उल्लेख करीत महापौर, सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आले, असेही वेलरासू यांनी नमूद केले. बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) एन. चंद्रशेखर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. श्रीमती स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासाठी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल 

News Desk

“शाळा सुरु झाल्यानंतरही शालेय साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही,” नितेश राणेंचे पालिका आयुक्तांना पत्र

News Desk

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

Aprna