HW News Marathi
महाराष्ट्र

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

मुंबई। संप मागे घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, त्याची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कामगारांच्या उपस्थितीमुळे आज ३६ बसेस रवाना केल्या. सुमारे ८०० ते ९०० प्रवाशांनी प्रवासदेखील केला आहे. याशिवाय खासगी वाहनेदेखील आगारातून सोडल्या जात आहेत, असेही श्री.चन्ने यांनी सांगितले.

एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनानेही आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांना कामावर परतायचे आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगतानाच अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरु होईल. त्यामुळे हा संप सुरू न ठेवता सर्व कामगारांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहनही श्री. शेखर चन्ने यांनी केले.

पत्रकार परिषदेदरम्यान ट्रायमॅक्स तिकिट कंत्राटाबाबत होत असलेल्या आरोपाबाबत श्री. चन्ने यांनी महामंडळाची भूमिका मांडली. ट्रायमॅक्स मशीन आपण भाड्याने घेतली नसून तीचे कंत्राट दिले आहे. करारामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मशीन घ्यायच्या झाल्या तर त्याला मनुष्यबळ, सॉफ्टवेअर लागणार. परंतु महामंडळाकडे तांत्रिक मुनष्यबळ नसल्याने ती विकत घेतलेली नाही. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल म्हणून प्रत्येक तिकिट विक्री नुसार हे त्यांना कंत्राट दिलेले असते, असेही चन्ने यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्यावतीने राज्यभरात लावण्यात आलेल्या रोपांसाठी २५ कोटींचा खर्च केल्याचा आरोप श्री. चन्ने यांनी फेटाळून लावला. रोपांसाठी महामंडळाने वेगळे बजेट केले नव्हते. वनविभागाने मोफत रोपे पुरवली होती, त्यानुसार महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आगारांच्या आवारात जेवढी जागा उपलब्ध होती तेथे झाडे लावली. २०१९ मध्ये ८ हजार झाडे लावली होती, असे सांगतानाच त्यासाठी वेगळा खर्च केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी कामगारांना यापूर्वी कापड आणि शिलाई भत्ता दिला जात होता. २०१८ साली त्यामध्ये बदल करून तयार गणवेश देण्यासाठी रीतसर निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा नमुना राष्ट्रीय फॅशन संशोधन संस्थेकडून बनवून घेण्यात आला. त्याची गुणवत्ता पूर्वीच्या गणवेशापेक्षा निश्चतच चांगली होती. पूर्वीच्या गणवेशामध्ये पॉलीस्टरचे प्रमाण जास्त असल्याने आरामदायी नव्हता. त्याऐवजी नव्या गणवेशाची गुणवत्ता अधिक चांगले असून त्यामध्ये पॉलिस्टरपेक्षा कॉटनचे प्रमाण जास्त आहे. तसेच गणेवशाबरोबरच बेल्ट, शुज याबरोबरच इतर वस्तूंचाही समावेश होता. त्यामुळे त्याची किंमत तुलनेने वाढली होती. त्यासाठी ५० कोटी रूपये वाचतील, असा दावा चुकीचा वाटतो, असे श्री. चन्ने म्हणाले.

जुन्या गाड्यांवर रंगरंगोटी करून नव्या भासवल्या जातात, या आरोपासंदर्भात बोलताना श्री.चन्ने म्हणाले, वाहनांचे ठराविक आयुर्मान पूर्ण झालेनंतर प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बसची पुर्नबांधणी करण्याची महामंडळामध्ये पद्धत आहे. महामंडळाच्या धोरणानुसार ८ वर्षानंतर ॲल्युमिनियम ऐवजी मजबूत अशा माईल्ड स्टीलचा बस पुर्नबांधणीसाठी वापर करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बसेसचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढले. तसेच पूर्वीच्या बसपेक्षा या बसेसमध्ये प्रवासीभिमुख सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत . नवीन बस खरेदी करण्यासाठी तब्बल ३० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्या तुलनेत पुर्नबांधणी केलेल्या बसेसचा खर्च अत्यल्प असल्याने महामंडळाच्या खर्चामध्ये बचतच झाली आहे. तसेच माईल्ड स्टीलच्या वापरामुळे बसेस मजबूत झाल्या आहेत, असे सांगतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

जुने टायर वापरून बसेस चालवल्या जातात, या गंभीर आरोपाबाबत बोलताना चन्ने म्हणाले, टायर झिजल्यानंतर त्याचे वरचे आवरण काढून दुसरे नवीन आवरण लावून सदर टायरचे आर्युमान वाढवले जाते. या पद्ध्तीला टायर पुर्न:स्थिरीकरण म्हणतात. ही पारंपारिक पद्धत आहे. ही पद्धत महामंडळामध्ये गेली अनेक वर्षे वापरली जात आहे. ही प्रक्रीया करण्यासाठी महामंडळाचे ९ टायर पुर्न:स्थिरीकरण प्रकल्प आहेत. त्यामुळे जुने टायर वापरून धोकादायक पद्धतीने प्रवास केला जातो हा आरोप चुकीचा आहे, असे चन्ने म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी बस-मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू

News Desk

तर निर्भयासारखी प्रकरणे घडतील…

swarit

MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा!

News Desk