HW News Marathi
महाराष्ट्र

ज्याची भीती होती तो वातावरण बदलाचा धोकादायक टप्पा सुरू झाला आहे.

अॅड. गिरीश राऊत | महाराष्ट्राच्या ११ जिल्ह्यांत गेले तीन चार दिवस तुफान बर्फवृष्टी चालू आहे. विदर्भ – मराठवाड्यात टेनिस बाॅलच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गारांच्या रूपाने अनेकांवर मृत्यूने घाला घातला.

माणसे व पिके उध्वस्त झाली.

बी टी, जी एम बियाण्यांचा कापुस, किडीला तोंड देऊ शकत नाही. त्यात बदलत्या तापमान, आर्द्रता इ.मुळे कीड, बुरशीमधे अचानक वाढ होऊ शकते. बोंड अळीमुळे कापुस गेला. त्यानंतर डिसेंबर च्या शेवटी पडलेल्या थंडीमुळे तुरीचे पिक फक्त सुमारे ४०% आले. आता अवकाळी, बर्फवृष्टी व वेगवान वार्‍यामुळे पिके गेली.

जागतिक हवामान संघटनेचा गेल्या वर्षीच्या दि.२३ मार्चचा अहवाल म्हणतो की, बदलत्या हवामानाबाबतचे आमचे आकलन संपले आहे. आपण अज्ञात प्रदेशात प्रवेश केला आहे.

त्याआधी वर्षभरा पूर्वी या संघटनेच्या अहवालात स्पष्ट केले होते की, ज्याची भीती होती तो वातावरण बदलाचा धोकादायक टप्पा सुरू झाला आहे.

पृथ्वीचे सरासरी तापमान दर वर्षी एक पंचमांश अंश सेल्सिअसने वाढू लागले आहे.

पर्यावरणीय विभाग दरवर्षी ३५ मैल या भितीदायक गतीने विषुववृत्तापांसुन दोन्ही ध्रुवांच्या दिशेने सरकू लागले आहेत.

आपल्या देशात या वास्तवाची जाणीव नाही. एकीकडे वातावरणात जीवघेणा बदल होत आहे. तर त्याला कारणीभूत असलेल्या औद्योगिकरणाद्वारे महाराष्ट्र व देश बदलण्याच्या वल्गना चालू आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप अशा योजना आणल्या जात आहेत. राजापूर, बाडमेरच्या रिफायन-या, नदी जोडणी, औद्योगिक कॉरिडाॅर, सागरमाला इ. भयानक गोष्टी विकासाच्या नावाखाली राबवण्याचा प्रयत्न होत आहे.

मोटार, वीज व सीमेंट या प्रगतीची चिन्हे मानलेल्या गोष्टी प्रत्यक्षात विनाशाच्या दूत आहेत. पृथ्वीवरील दर वर्षी होणार्‍या १००० कोटी टन कार्बन उत्सर्जनापैकी सुमारे ७५० कोटी टन उत्सर्जनास फक्त मोटार ( प्रत्यक्ष उत्सर्जन + रस्तेबांधणी + मोटार निर्मिती ) कारण आहे.

देशात कोळसा जाळून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे रोज २३ लाख टन कार्बन डायआॅक्साईड वायू वातावरणात सोडला जातो.

जेव्हढ्या वजनाचे सीमेंट बनते त्याच्या अर्ध्या वजनाचा कार्बन डायआॅक्साईड वायू वातावरणात वाढतो. अशीच गोष्ट पोलादाबाबत ( स्टील ) आहे.

याचा विदर्भ मराठवाड्यातील गारपीट, अवकाळी, वादळे, अतिथंडीने पिके जाण्याशी सरळ संबंध आहे. भूजल घटण्याची, वाढत्या वणव्यांशी , वादळांशी संबंध आहे.

सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकरी मागणी करतो. त्याचवेळी, तो या संकटाला आमंत्रण देणाऱ्या औद्योगिक शहरी ग्राहकांकडून अधिक भाव मिळावा अशीही अपेक्षा करतो. आधुनिक यंत्राधारित, रसायनाधारित शेती ही औद्योगिकरणाचा भाग आहे. त्यातील, रासायनिक खते, कीटक-बुरशीनाशके, बियाणी, वीज, धरणे, बोअरवेल, पंप, ट्रॅक्टर व इतर घटक यांच्यासाठीच्या आर्थिक मदतीबरोबरच त्याचाच परिणाम म्हणून होणाऱ्या नैसर्गिक वाटणार्‍या पण मानवनिर्मित असणाऱ्या दुर्घटनांच्या नुकसानभरपाई ची मागणी एका दमात केली जाते. यात काही चुकत आहे असे कुणाला वाटत नाही.

यामुळे दुष्टचक्र अधिक वेग घेत आहे. नोव्हेंबरमधे बाॅन येथे झालेल्या जागतिक परिषदेत, तापमान आता वाढतच राहणार आहे हे जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख डाॅ. पेट्टेरी टलास यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ दुर्घटना वाढत्या क्षेत्रात वाढत्या प्रमाणात व वाढत्या तीव्रतेने होत राहणार आहेत. नुकसानभरपाई व पॅकेज हा खरा उपाय नाही. कॅलिफोर्नियाच्या वणव्यांबाबत युनोने इशारा दिल्याप्रमाणे येत्या दशकात जगभर कोट्यावधी मानवांचे स्थलांतर सुरू होईल.

तापमानवाढीमुळे व अतिमासेमारीमुळे सागरातील मासळी संपुष्टात येत आहे. पिके दुर्घटनेनंतर काही काळ तरी येत राहतील. पण मासळी कायमची नष्ट होत आहे. मुंबई व इतरत्र मच्छिमार इतर नोकरी व्यवसायात गेले. त्यामुळे ते भरपाई मागताना दिसले नाहीत.

ब्रिटीश व इतर युरोपियनांनी यंत्र आल्यावर साधारण सन १७५० पासुन पहिली ५० – ६० वर्षे युरोपातील जंगल ऊर्जेसाठी नष्ट केले. भारतात ब्रिटिशांनी यंत्रयुग आणल्यानंतर औद्योगिकरण व शहरीकरणामुळे जंगल तोडले जाऊ लागले. स्वातंत्र्यलढ्यात पहिले उठाव आदिवासींकडून झाले. वाघ हत्ती व इतर सजीवांप्रमाणेच आदिवासींनी भरपाई मागितली नाही.

भरपाई ही काय गोष्ट आहे ? सध्या चलन म्हणजे कागद अथवा धातूचे नाणे. सोन्याच्या साठ्याच्या निकषावर ( गेली ३० – ४० वर्षे तेही पाळले जात नाही.) चलन म्हणजे कागद छापून पृथ्वीच्या गमावलेल्या जीवनाला व ते देण्याच्या क्षमतेला आपण पर्याय देतो अशी आपली चुकीची कल्पना आहे. अशा रितीने हा तथाकथित आधुनिक माणुस सर्व जीवन नष्ट होईपर्यंत वागणार काय ?

तोपर्यंत तो वागू शकणार नाही. फारतर पुढील पाच वर्षे वागू शकेल. कारण नंतर अर्थव्यवस्था कोसळेल.

यंत्र व चलन यांना पृथ्वीवर स्थान देणे ही चूक झाली. त्यावर बेतलेले अर्थशास्त्र हा तर वेडेपणा.

शेतकर्‍यांच्या आधीच्या आत्महत्या आधुनिक शेतीतील उत्पादनखर्चामुळे होत होत्या. गेल्या तीन, चार वर्षांत तापमानवाढीमुळे होणार्‍या आपत्तींमुळे पिक गमावण्याची भर पडली. यावर उपाय म्हणून शेतकरी उद्योग, शहरांत नोकरी करू लागला तर औषध रोगापेक्षा भयंकर ठरेल. प्रचंड लोकसंख्येचा भारत निसर्गस्नेही शेती करून सुमारे दहा हजार वर्षे साधेपणाने जगला, म्हणून तो व जग टिकले. आज भारताने पूर्वजांचे शहाणपण सोडले आहे असे दिसते. असा भारत स्वतःबरोबर जगाला नष्ट करेल. भारतीय नोकऱ्या करतील तर त्या देणारे औद्योगिकरण जैविक जगाचा अंत घडवेल. त्या वाटेवरचा भारत ही त्या अटळ अंताची सुरवात ठरेल. धक्कादायक गोष्ट ही की, जेव्हा येती पाच वर्षे ही जगाने उलट फिरण्याची शेवटची संधी आहे, तेव्हा ज्याने जगाला मार्ग दाखवायचा तो भारत अंताकडे वाटचाल करत आहे.

यंत्राबरोबर राहून,

निसर्गापासुन दूर जाऊन, जणू यंत्र बनलेला आधुनिक माणुस बुध्दीचा गैरवापर करत आहे. औद्योगिकरणाचा भाग बनण्यासाठी त्याला दिलेल्या शिक्षणामुळे तो जीवनाविरूध्द म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाविरूध्द उभा राहिला आहे. त्याचे आवडते गृहित, “आपण पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ प्राणी आहोत, तिचे स्वामी आहोत व पृथ्वी आपल्या उपभोगासाठी आहे.” प्रत्यक्षात त्याने मर्यादित परिघातील तोकड्या आकलनाने पृथ्वीशी वर्तन केले. परिणाम, मानवासह पूर्ण जीवसृष्टीचे उच्चाटन.

पॅरिस करारातील मानवजात वाचवण्यासाठी ठेवलेले २° से ची वाढ रोखण्याचे उद्दीष्ट चार, पाच वर्षांत ओलांडले जाणार आहे.

औद्योगिकरण, शहरीकरण व भौतिक विकास

ही चूक आहे. थोडेही कार्बन उत्सर्जन वा हरितद्रव्याचा

थोडाही नाश आता चालणार नाही. उलट हरितद्रव्य वाढले पाहिजे.

भाजून काढणाऱ्या उष्णतेचा अनुभव आला की, सौर वादळे व भयंकर स्वरूपाची बर्फवृष्टी झाली की सूर्य थंड होतोय म्हणून हिमयुग येत असल्याची आवई विज्ञानाच्या नावे उठवली जाते. मानवी लालसा , औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था याला कारण आहे हे लपवले जाते. कहर म्हणजे लोक ज्यांना मार्गदर्शक समजतात ती प्रसारमाध्यमे काही तुरळक अपवाद वगळता दिशाभूल करण्यात पुढे आहेत. उदा. काल दि. १३ फेब्रु. च्या लोकसत्ताचा गारपीटीच्या निमित्ताने अग्रलेख. यातील शीर्षकातील ठळक भाग पुढीलप्रमाणे, “शेतीवरील अवलंबित्व कमी करावयाचे तर शेतकऱ्यांत गुंतलेल्या हातांना काम हवे. म्हणजेच उद्योगधंदे वाचावयास हवेत.” समजुन उमजून किंवा अज्ञानामुळे असा प्रचार करणारे बुध्दीजीवी असल्यावर विनाशासाठी माथेफिरू अतिरेक्यांची गरज नाही.

आधुनिक उद्योग ही प्रगती, तो जगवतो, हा भ्रम आहे. त्याला कवटाळून राहणे व पृथ्वीच्या सृजनाचा भाग असलेली हजारो वर्षे होत असलेली शेती आज का होत नाही, याचा विचार टाळणे व शेतीपासुन दूर जाणे हा मानवजातीचा आत्मघात ठरेल. जेव्हा कुठेही शेती होणार नाही तेव्हा शहरे कशी जगणार ? खरा उपाय नेमका उलट आहे. जगातील औद्योगिकरण व शहरीकरण तात्काळ थांबवण्याची गरज आहे. नाहीतर वाढते तापमान व आपत्ती मानवजात व जीवसृष्टीचा चालू शतकात क्रमश: अंत घडवतील. जीवसृष्टीबाबत याची सुरवात झाली आहे. मानवाबाबत ते पाच वर्षांत स्पष्ट दिसेल.

आता प्रश्न भांडवलशाही किंवा इतर कोणती विचारसरणी वा वाद हवा हा नसून स्वयंचलित यंत्र, खुद्द भांडवल, ऊर्जावापर , मानवी मन व इंद्रियांची लालसा रोखणे इतक्या मूलभूत पातळीला पोचला आहे. वाचण्याचा उपाय सत्याग्रह आहे.

ज्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया येईल याचा विचार न करता समाजात सर्व थरात, घटकांत विचारमंथन व कृती व्हावी म्हणून कार्यरत होण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश !

News Desk

पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल !

News Desk

‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, पण…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

News Desk