HW News Marathi
महाराष्ट्र

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार! – डॉ. जितेंद्र आव्हाड

बीड | नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी आज (४ जानेवारी) निष्कासित करून पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. त्याठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की, बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्ष जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचे अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी निष्कासित करून प्रत्यक्षात साकारत आहे.

आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या व राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने म्हाडाची ‘सुकाणू अभिकरण’ (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे, असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले.

पुनर्विकासाचा पहिला टप्पा

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ब मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट अ मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा टप्पा क्रमांक १ अंतर्गत प्लॉट ब मधील २३ चाळींपैकी चाळ क्रमांक ५ बी, ८ बी व २२ बी मधील १७५ गाळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालय विभागास सेवानिवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवानिवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगांव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामधील २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांचा ताबा म्हाडातर्फे देण्यात आला आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयाने येथील १७५ कर्मचाऱ्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून चाळ ५ बी, ८ बी व २२ बी रिक्त करून दिली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाहून त्या ठिकाणी विक्री योग्य सदनिका (Saleble Component) बांधण्याचे प्रस्तावित आहे.

नायगाव बीडीडी- तीन हजार रहिवाशांची चाळ

नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण ३ हजार ३४४ रहिवासी वास्तव्यास आहेत. या प्रकल्पाकरिता वास्तूशास्त्रज्ञ सल्लागार व प्रकल्पाचे समन्वयक म्हणून में संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून मे. एल. अॅण्ड.टी. कन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पातील प्लॉट ब मधील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही. प्लॉट अ मधील चाळ क्रमांक १ अ, २ अ, १४ अ, १८ अ, १९ अ या ५ चाळीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लाभार्थ्याची अंतिम पात्रता यादी (३२५ पात्र) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्लॉट अ मधील चाळ क्रमांक १ अ. १८ अ, १९ अ मधील २२२ पात्र लाभार्थ्यांबाबत पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी गाळ्याचा क्रमांक संगणकीकृत आज्ञावलीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांची पात्रता अद्याप संचालक, बीडीडी यांच्याकडून निश्चित करण्यात आलेली नाही त्या लाभार्थ्यांच्या नावाऐवजी तात्पुरत्या स्वरूपात संचालक, बीडीडी यांच्या नावाची नोंदणी करून गाळेवाटप करण्यात आले आहे.

अशी असेल नवी इमारत

या प्रकल्पामध्ये ३ बेसमेंट स्टील्ट २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामांच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही”, रेमडेसिवीर वादावर सुजय विखे-पाटलांचे वक्तव्य

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, शरद पवारांकडून हीच नैतिकता अपेक्षित ! | चंद्रकांत पाटील

News Desk

“मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही!;” बाळासाहेब थोरात

News Desk