HW News Marathi
महाराष्ट्र

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – आठवले


पुणे। महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) भक्कम साथ आहे. ‘रिपाइं’ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करू नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपने मनसेच्या सोबत जाणे योग्य होणार नाही, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

क्रिकेट सामना होणे योग्य नाही

रामदास आठवले म्हणाले, पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांनाही चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणार आहे.

पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले विविध विषयांवर बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, असित गांगुर्डे, ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, माहिपाल वाघमारे, मोहन जगताप, श्याम सदाफुले आदी उपस्थित होते.

जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी

जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत

देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली. भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. तर महिपाल वाघमारे यांनी आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परळीतील व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी १६ सावकारांवर गुन्हा

Aprna

ओबीसी आरक्षण अडचणीत आणि मंत्री परदेशात; पडळकरांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

Aprna

आज सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी साधणार संवाद!

News Desk