मुंबई। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे, हे हक्काचे घर मिळविण्यासाठी जो संघर्ष केला आहे, तो विसरु नका आणि हा संघर्ष वायादेखील जाऊ देऊ नका, त्यासाठी मिळालेली ही घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२२ फेब्रुवारी) पत्राचाळवासियांना घातली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस, सुनिल प्रभू, विद्या ठाकूर, विद्याताई चव्हाण, माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.
पत्रा चाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रखडला होता, आंदोलने, उपोषणे झालीत आणि अखेर हा प्रश्न आज मार्गी लागला आहे, हा क्षण पहायला पत्राचाळीतील जे रहिवासी आज हयात देखील नाहीत, त्यांना मी अभिवादन करतो. पत्राचाळीचा प्रश्न सोडविण्याची मागणी घेऊन संघर्ष समितीला दिलेले वचन काल पूर्ण केले असून अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज होत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. कॅबिनेटमध्येही या विषयाला त्यांनी नेहमी वाचा फोडली असे सांगून कामं अनेक असतात, मुंबईत हक्काच घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीनं आजचा शुभ दिन आहे. चिकाटी आणि जिद्द असली की काही करता येते, हे या कामातून दिसते. अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यांचे किमान हक्काचं घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न या कामाच्या निमित्तानं पूर्ण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिसांना चांगली निवासस्थाने देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम – खासदार शरद पवार
पोलीस कॉन्स्टेबल्सच्या घरांचा मोठा प्रश्न असून त्यांच्या निवासस्थानाची स्थिती आणि उपलब्ध असलेली जागा पाहता अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना चांगले घर देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गृह आणि गृहनिर्माण विभागाने एकत्र बसून पोलीसांना चांगली निवासस्थाने देण्यासाठी नियोजन करा, मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन कालबद्ध कार्यक्रम हाती घ्या, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी केली. लहान आणि मध्यमवर्गीयांच्या घरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केलेल्या मृणालताई गोरे यांची काल आठवण होते, ज्या विषयाची त्यांना आस्था होती त्याच विषयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री यांनी लक्ष घातल्याने आज या पत्राचाळ प्रकल्पाचा शुभारंभ होत असल्याचे खासदार शरद पवार म्हणाले. सरकारने घरांचा प्रश्न हातात घेतला असून बीडीडी चाळीच्या रेंगाळलेल्या प्रकल्पाच्या कामाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गती दिल्याचेही ते म्हणाले.
विविध गृहप्रकल्प गतीने मार्गी लावणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन कार्य करणाऱ्या सरकारने कोरोनाच्या काळात कुठल्याही स्थितीत विकासाला खीळ बसू दिली नाही. आरोग्याच्या सुविधा पुरवितानाच लसीकरण वाढविण्यावर जोर दिला आणि घरांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका स्वीकारली. धारावीचा प्रकल्प मार्गी लावण्याचीदेखील शासनाची इच्छा आहे. विविध गृहप्रकल्पांसाठी मंत्रीमंडळाच्या आवश्यक त्या सर्व मान्यता देण्यासाठी तत्पर असून कामे झटपट करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पत्राचाळवासीयांना भाडे देण्याच्या निर्णयाची तात्काळ घोषणा केल्याबद्दल गृहनिर्माणमंत्र्यांचे कौतुक करुन या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. पत्राचाळ हे बोलीभाषेतील नाव असले तरी यापुढच्या काळात या चाळीला सिद्धार्थनगर अशी ओळख देण्याची आवश्यकता असून शासकीय कागदपत्रे, अभिलेखांमध्ये तसा उल्लेख करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
पत्राचाळीतील रहिवाशांना तीन वर्षात घरे ताब्यात देणार- गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
कोरोनाचे संकट नसते तर या प्रकल्पाचा शुभारंभ यापूर्वीच झाला असता असे सांगून पत्राचाळीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे ४२ बैठका घेऊन दर आठवड्याला आढावा घेतला, सतत पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून ‘म्हाडा’ वर विश्वास ठेवा, येत्या तीन वर्षात घरे ताब्यात देण्याची ग्वाही यावेळी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपल्या जमीनी कुणालाही द्यायच्या नाहीत हा निर्णय म्हाडाने घेतला असून म्हाडाच्या जमीनी उत्तमपणे विकसित करु आणि त्यातून लाखभर रहिवाशांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वासही डॉ. आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. म्हाडाने कोविडकाळात तसेच अतिवृष्टीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करुन मध्य मुंबईत लवकरच ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. ताडदेवमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह बांधण्यात येणार असून गोरेगावमध्ये १० एकर जागेवर सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही गृहनिर्माणमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यातील मोठ्या शहरातील पुनर्विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘म्हाडा’ महाराष्ट्रभरात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्राचाळीतील रहिवाशी सध्या भाड्याच्या घरात असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना भाडे मिळालेले नाही हे भाडे येत्या १ एप्रिलपासून नियमितपणे देणार असल्याची घोषणाही गृहनिर्माणमंत्र्यांनी यावेळी केली.
एका तपाच्या संघर्षाचा सुवर्णदिन- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
गृहनिर्माणच्या क्षेत्रात शासनाने उत्तम काम केले असून पत्राचाळवासियांचा १२ वर्षाच्या संघर्षाचा हा सुवर्णदिन आहे. सरकारने कोरोनाच्या आणि नैसर्गिक संकटाच्या काळात देखील विकासकामांना गती दिली असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
इतर गृहप्रकल्पांसाठी कालबद्ध कार्यक्रम – वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख
बीडीडी चाळ आणि पत्राचाळ प्रकल्पाच्या शुभारंभाने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, इतर प्रकल्पांसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केले.
मुंबईकरांच्या पाठीशी शासन –गृहनिर्माणराज्यमंत्री सतेज पाटील
पत्राचाळवासियांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा संघर्ष आज संपला आहे. राज्य शासन सामान्य मुंबईकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या प्रकल्पाच्या माध्यमातून दिला गेला आहे. अनेक अडचणींमधून मार्ग काढून हा प्रकल्प आता सुरु होत असल्याचे सांगून ‘म्हाडा’ ने कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याची गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रशंसा केली.
म्हाडा सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पाविषयी….
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागणार आहे. ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे. म्हाडा स्वतः विकासक म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे काम करीत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.