HW News Marathi
महाराष्ट्र

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

मुंबई । वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ एप्रिल) येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती करावी. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज बचतीबाबत ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिकास्तरांपर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वीजनिर्मितीच्या नियोजनाबाबत आज उर्जा विभागाची बैठक झाली. बैठकीस ऊर्जार्मंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्याची विजेची निकड पूर्ण व्हावी यासाठी सर्व ते पर्यायांची पडताळणी करण्यात यावी. वीज गळतीच्या बाबतीत बेजबाबदारपणा चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वीजेचे संकट हे केवळ आपल्या राज्यातच नाही तर ते देशातील अन्य राज्यांतही आहे. त्यामुळे अन्य राज्ये करत असलेल्या उपाययोजना, वीज देवाण-घेवाण याबाबत माहिती घेण्यात यावी. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क करावे. सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, विजेची समस्या ही अपुरा कोळसा पुरवठा त्याचबरोबर उन्हाळ्यात अचानक वाढलेली मागणी यामुळे निर्माण झाली असून यावर तात्काळ तोडगा काढण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वॉर स्टेशन स्थापन करण्यात आल्या आहेत. वीज तुटवडा असणारे महाराष्ट्र हे एकच राज्य नसून, देशात २७ राज्यांमध्ये अशीच स्थिती आहे. राज्यात अखंडीत वीज उपलब्ध व्हावी यासाठी कोळसा आयात कऱण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, वीज बचत करणारी उपकरणे वापरणे, वीज वापराबाबातचे ऊर्जा परिक्षण, नादुरूस्त उपकेंद्र बंद करणे असे ऊर्जा बचतीच्या उपाय योजना करण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय वीज निर्मितीसाठी कोळश्याचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाँशरीजमधून कोळसा आणण्यासाठी रेल्वे उपलब्ध न झाल्यास, रस्तेमार्गे वाहतूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत कोळसा उपलब्धता, विविध वीज प्रकल्पांची सद्यस्थिती याबाबत माहिती देण्यात आली. काही खासगी वीज कंपन्या करारानुसार वीज पुरवठा करत नसल्याने, त्यांना करार भंगाबाबत नोटीस देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नारायण राणे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk

अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, आठवलेंचा विश्वास

News Desk

संत भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा! – पंकजा मुंडे

Aprna