मुंबई | “आपली विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी… सन्मानासाठी… स्वाभिमानासाठी… एवढ्या हजारोंच्या संख्येने… संयमाने आणि शिस्तीने सर्व आलात. यातून चुकीच्या प्रवृत्तीला काही धडा मिळेल, जर त्यांनी यातून काही धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलथवून कसे टाकायचे याचा विचार करू”, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला दिले. महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात आज (17 डिसेंबर) भव्य महामोर्चा पार पडला. या महामोर्चात शरद पवार यांनी राज्यपालांसह सत्ताधार्यांना थेट इशाराही दिला.
“आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचे दर्शन ठरत आहे. मला आठवतय ७० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबई नगरीमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले त्यांनी कसला विचार केला नाही. महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र मिळाला. पण तरीही आज मराठी भाषिक महाराष्ट्राबाहेर आहेत. ते महाराष्ट्रात येण्यासाठी आग्रह करत आहेत त्यामध्ये बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर व अन्य भागातील असतील त्या सर्वांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे त्या भावनांशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा अंतःकरणापासून सहभागी आहे”, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
“आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने आपण का जमलो ही तरुणांची शक्ती एकत्र का आली त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्राचा सन्मानासाठी… आज त्यावरच हल्ले होऊ लागले आहेत. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे आहेत ते सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या युगपुरुषांबद्दल एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. संपूर्ण भारताला एक आत्मविश्वास देण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्षे झाली तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणात एक नाव अखंड आहे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुल्लेख राज्याचा एक मंत्री करतो. व सत्ताधारी पक्षाचे घटक करतात. हे कदापि महाराष्ट्र सहन
करणार नाही. आणि ती तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलात आज ज्या विश्वासाने तुम्ही आलात त्या विश्वासाची नोंद राज्यकर्त्यांनी घेतली नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना तुम्ही धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही”, अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत, सन्मानचिन्ह आहेत. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, ही आमची सगळी सन्मानाची, आदराची स्थाने आहेत. आजचे राज्यकर्ते त्यांच्याबद्दल बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधी पाहिला नाही. मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली या कालावधीत अनेक राज्यपाल पाहिले. शंकरदयाल शर्मा असो यांच्यासह अनेकांची नावे सांगता येतील. महाराष्ट्राचे नावलौकिक वाढवण्याचे काम या लोकांनी केले. पण यावेळेला एका व्यक्तीला आणले आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात आणत आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलतात त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी सामान्य माणसाला संघटीत करण्यासाठी आधुनिक विचार देण्यासाठी, शेतीमध्ये बदल आणण्यासाठी, स्त्री शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी महात्मा फुलेंचे नाव घेता येईल. मी बिहार, उत्तरप्रदेश दक्षिण भारतात जातो तिथे महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते.ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठे काम केले त्याव्यक्तीच्या विरोधात टिंगलटवाळी राज्यपालाकडून केली जात असेल तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
या मोर्चाच्या माध्यमातून केंद्रसरकारला लोकशाहीच्या मार्गाने संदेश द्यायचा आहे की राज्यपालांची हाकलपट्टी लवकरात लवकर करा. आज महाराष्ट्रातील लोकं शांतप्रिय आहेत, जर यांची हकालपट्टी वेळेत केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची आहे. कोणी मंत्री शिक्षण संस्था काढण्यासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे वक्तव्य करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची दालने नव्हती त्यावेळी औरंगाबाद येथे मराठवाड्याला शिक्षणाचे दालन उभे करण्याचे फार मोठे काम केले. महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात शाळा सुरु केली. सावित्री बाईंना पुढे करून शिक्षणाची दालने खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी संबंध आयुष्य ज्ञानदानासाठी घालवले. कर्मवीरांनी ज्यांच्या घरी अन्न नव्हते ते उभे करण्यासाठी खबरदारी घेतली पण कधीही लाचारी स्विकारली नाही. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह काढली व हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. आज अशा व्यक्तींसंबंधीचा उल्लेख करताना कोणी गलिच्छ शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल असेही शरद पवार म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.