HW News Marathi
महाराष्ट्र

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

मुंबई । निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.

293 अन्वये प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार आतापर्यंत कुणीच केला नाही. मुंबईसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला मग ते गिरणी कामगार असतील, इतर काबाडकष्ट करणारे असतील, ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कुणीच केला नव्हता, तो विचार या सरकारने गांभीर्याने केला. हा विचार कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणणारे हे शासन असून कामाला गती देण्यात आली आहे, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मला अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना घरे देणार

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करून देशात सर्वात उत्तम उदाहरण उभे करण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर देण्यासाठीच शासनाच्या योजना

आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे ते ठरविण्याच्या दृष्टीने जे मुंबईतील कष्टकरी आहेत, जे दुसऱ्यांचे घरं बांधतात पण त्यांची स्वत:ची घरं नाहीत. मुंबईत अनेकजण येतात, अन्न, वस्त्र, निवारा शोधतात त्यांना अन्न वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकायला त्यांच्याकडे स्वत:चं घर नसतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी 1995 साली झोपडपट्टीवासियांना त्यांचे हक्काचे मोफत घर मिळालेच पाहिजेत असा विचार मांडला आणि त्यादिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आज किती वर्षे झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे, अनेक झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प सुरु झाले पण त्याची गती कासवगतीपेक्षा मंद राहिली. आपण असं ऐकतो की, आजोबा नारळाचे झाड लावतात पण त्याचे फळ नातवाला मिळते असं आपण म्हणतो, आता नातवंडाच्या पुढेही दिवस जात चालले आहेत, फळं लागताहेत पण मलई कोण खाते आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे स्वत:ची हक्काची घरं सोडून जी माणसे ट्रॅन्झीक्ट कॅम्पमध्ये राहात आहेत, काबाडकष्ट करत आहेत त्यांना घर मिळवून देण्यासाठी ज्या योजना आणल्या त्यासाठी सहकारी मंत्र्यांचे अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंबईतील रखडलेल्या घरांसाठी ॲम्न्स्टी स्कीम आणणार

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाची जी योजना आहे त्यामध्ये आम्ही अनेकदा गती देण्याचा विचार केला. त्यात हा ही विषय मांडला गेला की, काही विकासकांनी लुट केली, लुबाडले, त्यांची चौकशी केली जाईल. ज्यांची घरे अडली त्यांचा काय दोष आहे, अशा रखडलेल्या घरांसाठी ॲम्न्स्टी स्कीम आणणार जेणेकरून रखडलेल्या घरांना चालना मिळेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील आमदारांसाठी मुंबईत घर

लोकांचं झालं मग लोकप्रतिनिधीचे काय असा विचार करतांना या लोकप्रतिनिधींसाठी ३०० आमदारांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. या माध्यमातून सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत त्याचाही आनंद असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारचे केंद्राला 800 कोटी ; पाठपुरावा करण्याची गरज

धारावीचा पुनर्विकास मला आठवतं मी अनेकदा सांगितले असेल की ज्यावेळी आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेंव्हा चौफेर पसरलेली खाडी होती. विकास झाला, मोठमोठी कार्यालये झाली. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालं, असं म्हणतात की, जगातील सर्वात महागड्या जागेपैकी ती एक जागा आहे आणि त्याच्या बाजूला धारावी आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही याचे कारण दुर्देवाने केंद्रासोबत आपली जी बोलणी सुरु आहेत, रेल्वेची जी जमीन आहे त्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये दिले गेले आहेत पण अजूनही, ती जमीन आपल्याला हस्तांतरीत होत नाही. मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो देखील आहे. अशा काही अडीअडचणीच्या गोष्टी आहेत. केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्या जागांचे काय केले पाहिजे, त्याचा कसा विनियोग केला गेला पाहिजे याचा नुसता विचार करून चालणार नाही तर केंद्राकडे पाठपुरावा करून मुंबईतील जनतेसाठी याचा एकदा निकाल लावला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला सुरुवात

अनेक वर्षे रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न आपण सोडवला, बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला सुरुवात झाली. नोकरदार महिला आणि शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी वसतीगृह बांधण्यात येणार आहेत. त्याच बरोबर म्हाडाचे सेवाशुल्क किंवा अकृषक कर यामुळे अडकलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यात येत आहे. मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी जे काम करतात त्या सफाई कामगारांसाठीही शासनाने विचार केला आहे.

सफाई कामगारांना घरे

मुंबईतील महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे की ज्याप्रमाणे आपण ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला आपण घर देत आहोत. शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांनासुद्धा आपण घरे दिली आहेत. त्याचप्रमाणे सफाई कामगारांना देखील घरे देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

Aprna

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

News Desk

पंकजांसोबत आजही बहिणीसारखचं नातं, फडणवीसांच्या वक्तव्यावर पंकजांचं ‘हे’ उत्तर

News Desk