HW News Marathi
महाराष्ट्र

रिद्धपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार! – उपमुख्यमंत्री

नाशिक । भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाद्वारे सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन सर्व जाती धर्माला एकतेचा संदेश दिला आहे. महानुभाव पंथाचा हा विचार प्रागतिक स्वरूपाचा असल्याने देशाला पुढे घेऊन जाणारा आहे. तसेच रिद्धपूर येथे मराठी आद्य ग्रंथ लीळाचरित्राची निर्मिती झाली असून त्या ठिकाणाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले आहे. या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, आमदार एकनाथ खडसे, देवयानी फरांदे, सिमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, आचार्य प्रवर परमपूज्य महंत सुकणेकर बाबा शास्त्री, कविश्वर आम्नायाचार्य विद्वांस बाब, कारंजेकर बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता अवतार धारण करून ज्ञानाची परिभाषा व अहिंसेचा मूलमंत्र देण्याचे काम आपल्या विचारातून केले आहे. वेगवेगळ्या समाजातील लोकांना जोडून अखंड मानव जात एक असल्याची शिकवण दिली आहे. यासोबतच महानुभाव पंथामध्ये महिलांनादेखील समान स्थान देऊन साधनेत त्यांना प्राधान्य दिले आहे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चमत्काराच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला पटवून दिला आहे.  आठशे वर्षांपूर्वीच्या कर्मकांडांच्या काळात चक्रधर स्वामींचे वैज्ञानिक दृष्टी असलेला समतेचा विचार सर्वांसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लीळाचरित्राच्या निर्मितीसोबतच महानुभाव पंथाचे साडेसहा हजार ग्रंथ तयार झाले ते रिद्धपूर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करावे, ही मागणी रास्त असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,  महानुभाव संमेलनाच्या निमित्ताने मिनी कुंभमेळ्याचा अनुभव होत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्याही प्रकारचा जाती-धर्माचा भेद न करता जनतेच्या सेवेला महत्त्व देऊन सर्वांना सामावून घेण्याचे काम महानुभाव पंथ करीत असतो. या संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे  मंत्री  महाजन यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला महानुभाव पंथाच्या सप्तग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील यांनी केले. यावेळी आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच संमेलन स्वागत समिती सदस्य दत्ता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.  शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाच्या शोभा यात्रेला महानुभाव पंथाचा ध्वज दाखवून प्रारंभ केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा ! राष्ट्रवादीचा काँग्रेसला सल्ला

News Desk

३० वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याचा नारा ऐकत आहे – शरद पवार

News Desk

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

News Desk