मुंबई | कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स व विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक आहेत. या टास्कफोर्समध्ये खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुझ्झफर हुसेन, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शाह, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार संग्राम थोपटे, आ. रणजित कांबळे, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे सदस्य आहेत तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख हे टास्क फोर्सचे सचिव आहेत.
To fight against #CoronaVirus, Maharashtra Pradesh Congress Committee forms a #Covid19 task force and other sub-committees. #CongressFightsCorona pic.twitter.com/lZhTYgeNKZ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 9, 2020
या टास्कफोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात सामाजिक व आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमिती व माध्यम, सोशल मीडिया व मदत कक्ष या उप समित्या कार्यरत असतील. सामाजिक व आर्थिक परिणाम उपसमितीचे अध्यक्ष आमदार अमिन पटेल असतील. डॉ. रत्नाकर महाजन हे समन्वयक तर चित्रा बाथम सचिव आहेत. कोरोना संकटाचे समाजील विविध घटकांवर कोणते सामाजिक व आर्थिक परिणाम झाले याचा अभ्यास करुन यासंदर्भात काय उपायोजना कराव्यात याबाबत सरकारला सूचना करेल.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असून माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव ह्या समन्वयक व डॉ. मनोज राका सचिव आहेत. ही उपसमिती वैद्यकीय सेवेचे अवलोकन करुन सरकारी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात सूचना करेल. शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी समन्वयक असतील. समितीच्या सचिव म्हणून अमर खानापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते का ह्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या उपसमितीवर आहे.
तसेच माध्यम, सोशल मीडिया व मदत कक्ष या उप समितीच्या अध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांची तर समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची तर सचिवपदी श्रीनिवास बिक्कड यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम व समाज माध्यमासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून राज्य सरकारने केलेल्या उपयोयोजनांना विविध माध्यमातून प्रसिद्धी देण्याचे तसेच केंद्र सरकारच्या योजनांमधील त्रुटी समोर आणण्याचे काम या उपसमितीकडून केले जाणार आहे तसेच प्रदेश काँग्रेसच्या मदत कक्षावर येणाऱ्या तक्रारी व सूचनांची माहिती देण्याचे कामही हे उपसमिती करणार आहे. या उपसमित्यांचे अध्यक्ष हेसुद्धा टास्कफोर्सचे सदस्य असतील.
राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेले मदत कार्य गतीमान करणे, काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोविड-१९ च्या लढ्यात मदत करणे, त्यांना अधिकाधिक सक्रीय करणे, कोविड-१९ च्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे, ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.