HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी! – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी | जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज येथे व्यक्त केले.  सामंत यांच्या हस्ते आज (१२ फेब्रुवारी) शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे महाराष्ट्रातील पहिल्या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उद्योग विभागाचे सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जीएस हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, बँक प्रतिनिधी, अण्णा सामंत, युवा हब चे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. माझ्याकडे उद्योग खाते असल्याने त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली. या नोकरी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यासाठी ऑनलाईन ७ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले तसेच ऑफलाईन अर्जही मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. राज्यासह राज्याबाहेरील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १३० कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सामंत पुढे म्हणाले की, रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारुन येथील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची इच्छा उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी एका भेटीत व्यक्त केली. तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरी मध्ये उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. परंतु येथील जनतेने मानसिकता बदलणे फार गरजेचे असल्याचे आहे, जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे.

कोकणातील तरुणाईने नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारचे मेळावे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुण-तरुणींसाठी ऐतिहासिक नोकरी मेळावा सीमा भागात घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज मंजूरी पत्र वाटप करताना मंत्री सामंत नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनावे. स्वतःचे उद्योग उभारावेत असे आवाहन उपस्थित तरुण-तरुणींना केले. पुणे जिल्ह्यातील तळेगांव येथील महिलांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नर्सरीचे त्यांनी उदाहरण दिले. या महिलांसारखेच कोकणातील महिलांनी-युवतींनीही नाविन्यपूर्ण उद्योग करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून ज्या युवक युवतींची नोकरीसाठी अंतिम निवड झालेली आहे अशांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा बँ व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला. मिलिंद गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. सतीश भामरे यांनी प्रस्तावना केली. विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

मूकबधीर युवकांच्या रोजगारासाठी पालकमंत्री  सामंत यांनी घेतला पुढाकार

दरम्यान महामेळाव्यानिमित्त काही मूकबधीर युवक या ठिकाणी आल्याचे पालकमंत्र्यांना समजले. अशा युवकांना कोणते काम, नोकरी द्यायची हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा असल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने या युवकांसाठी तात्काळ तिथेच बैठक आयोजित केली. त्या सर्व युवकांची व त्यांच्यासह आलेल्या पालकांची मंत्री  सामंत यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला. या युवकांना कशा प्रकारे नोकरी देता येईल, त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेसाठी काय करता येईल, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली.

मूकबधीर युवकांकडे कौशल्य,बुद्धी असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे आता या युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसातच स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत या युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पालिकेत कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला

News Desk

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३२०२,कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी । राजेश टोपे

News Desk

Maharashtra Budget 2021-22 : महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांसाठी खास भेट

News Desk