HW News Marathi
देश / विदेश

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज – सामना  

मुंबई | संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA चं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नसीम खान यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करत, काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. “स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते.

आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आम्चेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!” अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वावर खोचक टीका केली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

स्वातंत्र्य लढय़ात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठय़ा खायला तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे. आघाडीतील सर्वात मोठय़ा पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, असे काँग्रेसचे नेते हरीश रावत म्हणतात. ते योग्य तेच बोलले आहेत, पण या मोठय़ा पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी, अशी सगळय़ांची अपेक्षा आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत.

लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे. आता अगदी साधे व ताजे उदाहरण घ्या. कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसंदर्भात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मोठी घोषणा केली आहे. 2023 ची निवडणूक आपला जनता दल सेक्युलर म्हणजे जेडीएस स्वतंत्रपणे आणि स्वबळावर लढविणार आहे. देवेगौडा हे काँग्रेसचे एकेकाळचे साथी. कर्नाटकात त्यांचे सुपुत्र कुमारस्वामी यांनी काँग्रेसबरोबर सरकारही स्थापन केले. पण आज या दोन पक्षांत दरी आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा फायदा शेवटी भारतीय जनता पक्षालाच होईल. कर्नाटक हे असे राज्य आहे की, जेथे महाराष्ट्राप्रमाणे काँग्रेसची पाळेमुळे गावागावांत रुजलेली आहेत. कर्नाटकात काँग्रेसला चांगले नेतृत्वही लाभले आहे. काँग्रेसला भवितव्य असलेले हे राज्य आहे, पण मत विभागणीच्या खेळात तेथे भाजपचे फावते. त्यामुळे देवेगौडा, कुमारस्वामी यांचे मन वळविण्याचे काम कोण करणार? देवेगौडा, कुमारस्वामींसारखे अनेक घटक राज्याराज्यांत आहेत. खुद्द बिहारातील नितीश कुमारांचे सरकार असंतोषाच्या ज्वालामुखीत रटरटत आहे.

जदयुचे अरुणाचलातील सहा आमदार भाजपने फोडलेच, पण आता अशीही बातमी आहे की, बिहारातील जदयुलाच सुरुंग लावून भाजप स्वबळावर मुख्यमंत्री बसविण्याच्या तयारीत आहे. बिहारात काँग्रेस, राजदसारख्या पक्षांचे आमदार ते फोडणार आहेत म्हणे. ते राहू द्या बाजूला. पण ज्या नितीश कुमारांना मांडीवर घेऊन ते राजशकट हाकीत आहेत, त्या नितीश कुमारांच्या पक्षालाच भोके पाडण्याचे काम सुरू झाले. यावर नितीशकुमार अस्वस्थ आहेत व त्यांनी नाराजी व्यक्त केली. नितीश कुमारांनी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. या सगळ्या घडामोडी देशातील विरोधी पक्षाने गांभीर्याने घ्यायला हव्यात. काँग्रेस मोठा पक्ष आहेच. स्वातंत्र्य लढय़ात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे, पण तेव्हा काँग्रेसला समोर पर्याय नव्हता. विरोधी पक्षही तोळामासाचा होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्या लोकप्रिय नेतृत्वाने देश भारावलेला होता. काँग्रेसने दगड उभा केला, तरी लोक भरभरून मतदान करीत होते. काँग्रेसविरोधात बोलणे हा त्या काळात अपराध ठरविला जात होता. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठय़ा खायला तयार होते.

आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजप विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. एकेकाळी ईशान्येकडील राज्यांतही काँग्रेस हा बलदंड पक्ष होता. आज चित्र बदलले आहे. ख्रिश्चन, आदिवासी मतदारांचे प्राबल्य असूनही ईशान्येत भाजपला मोठे यश मिळत आहे. अरुणाचल प्रदेशात काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. तेथील आकडेवारी धक्कादायक आहे. भाजपास 171 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. इटानगरमध्ये प्रथमच निवडणूक लढविणाऱया जदयुला 9 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठय़ा पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशात एस्मा कायदा लागू, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती

News Desk

भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित

News Desk

Republic Day | प्रजासत्ताक दिनाची ही छायाचित्रे नक्की पहा

News Desk