HW News Marathi
महाराष्ट्र

रस्त्यांची डागडुजी, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थानातील सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावेत! – एकनाथ शिंदे

मुंबई | ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करून आपत्तीकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जिल्ह्यातील महानगरपालिका, पोलीस, एमएमआरडीए, एमएससारडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसईबी, रेल्वे, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आशा सर्वच यंत्रणासोबत घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना हे स्पष्ट निर्देश दिले.

सद्य:स्थितीत महानगरपालिकास्तरावर अनेक विकासकामे सुरू असून त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा. मेनहोल उघडी राहू नयेत, ड्रेनेज लाईनवर झाकणे असावीत, रस्त्यावरील झाडांची आधीच छाटणी करावी, अशा सूचना देखील शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या ज्या रस्त्यावर कोणत्याही कारणामुळे खड्डे पडले असतील, नालेसफाई अर्धवट राहिली असेल ती तातडीने पूर्ण करा, असेही निर्देश दिले. शहरांतर्गत रस्ते आणि पुलांची सद्य:स्थिती आणि त्यांची दुरुस्ती यांचा आढावा देखील त्यांनी या बैठकीत घेतला.

ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, पनवेल आणि भिवंडी या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी आपापल्या पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व तयारी कशाप्रकारे करण्यात आलेली आहे, याची माहिती दिली. यात प्रामुख्याने आपत्कालीन कक्ष उभारणे, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे, बोटी, पाणबुडे, बचाव पथक, पाणी उपसण्यासाठी वापरायचे पंप, फोगिंग मशिन्स, निर्जंतुकिकरण करण्यासाठी लागणारी औषधे, तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागा, अग्निशमन दलाची सज्जता असे सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले.

ठाणे महानगरपालिकेने आपले टीडीआरएफचे पथक सज्ज ठेवले आहे. तर नवी मुंबईत डोंगराच्या कडेला राहणाऱ्या लोकांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेने समुद्रात अडकणाऱ्या बोटींना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांच्या बोटी सज्ज ठेवल्या आहेत. तर सिडकोने आपल्या हद्दीत अवजड वाहने वाहतूक कोंडीचे नियमन करण्यासाठी जेएनपीटी जवळ दोन स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते तत्काळ बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ज्या रस्त्यांवर दरदिवशी वाहतूक कोंडी होते ती सोडवण्यासाठी पर्यायांचा विचार देखील या बैठकीत करण्यात आला. यात प्रामुख्याने साकेत पुलाची डागडुजी वेळेत करणे, मुंब्रा बायपास रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन पूर्ण करणे आणि मान्सूननंतर त्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेणे, भिवंडी- अंजुरफाटा-वडपा या मार्गाची डागडुजी करून तो तातडीने वापरण्या योग्य करणे, घोडबंदर रोडवर फाउंटन हॉटेलपाशी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत असल्याने या भागात खड्डे बुजवण्यासाठी एक टीम कायम तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहापूर- मुरबाड- खोपोली येथील खराब रस्त्या तातडीने दुरुस्त करून वापरण्यायोग्य बनवणे, माळशेज घाटात सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाची सद्य:स्थिती जाणून घेऊन या कामाचा वेग वाढवण्याच्या सुचना देखील मंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

बदलापूर, अंबरनाथ दरम्यान दरवर्षी उल्हास नदीला पूर आल्यावर नागरिक अडकून पडत असल्याने तिथे कायमस्वरूपी बोटी आणि मनुष्यबळ तैनात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गेल्या काही दिवसात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी कल्याण, दिवा येथे थेट रेल्वेरुळाच्या नजीक येऊन वाळूचोरी करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यामुळे कधीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता महसूल विभागाला या अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी दोषींवर गुन्हे दाखल करावेत याबाबतीत कुणाचीही हयगय करू नये असे आदेशच शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले आहेत.

शहरात उपनगरात पावसाळ्याच्या दिवसात रेल्वे पुरात अडकणे, इमारत कोसळणे, नागरिक पुराच्या वेढ्यात अडकून पडणे अशावेळी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात येते, एनडीआरएफच्या 2 तुकड्या ठाणे जिल्ह्यात सज्ज ठेवण्यात येणार असून त्यांच्या राहण्या थांबण्याची व्यवस्था देखील संबंधित मनपा क्षेत्रात करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई वेळेत पूर्ण करावी, एमएसईबीची यंत्रणा चोख असावी, कधी लाईट गेलेच तर तातडीने ते दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदार आणि त्यांची माणसे तातडीने उपलब्ध व्हावीत आशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मान्सून काळात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी पुरेशा औषधांचा साठा करून ठेवण्याच्या सूचना देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. ‘मान्सूनमध्ये उद्भवणारी परिस्थिती नीट हाताळायची असेल तर आतापासूनच त्याची नीट तयारी करावी लागेल, आज प्रत्यक्ष फिल्डवर उतरून घेतलेले कष्ट उद्या प्रत्यक्ष पावसाळ्यात आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मनपा आयुक्त, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आशा सगळ्यांनीच याबाबत पूर्ण तयारी करा,’ असे स्पष्ट निर्देश मंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, कोकण विभागाचे विशेष महानिरिक्षक संजय मोहिते, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन सिंग, मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, ठाणे पोलीस अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, ठाणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंघोळीची गोळी संस्थेला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

News Desk

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक! – देवेंद्र फडणवीस

Aprna