HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

ठाणे | लोकांची दुःख आपली मानून काम करत राहिलो म्हणूनच सर्वसामान्य लोकांकडून हे प्रेम आणि आदर मिळाल्याचे उदगार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या लोकनाथ या विशेष गाण्याच्या ध्वनिचित्रफितीच्या अनावरण सोहळ्याचे एससीआर कम्युनिकेअर, साहिल मोशन आर्टस्, सुमन एंटरटेनमेंट आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी लिहिलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. तर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर आणि अवधूत गुप्ते यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या हस्ते या गीताचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी या सोहळ्याला अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

अभिनेता सुनील शेट्टी याने यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांना आपण सर्वच जण एक सजग नेता म्हणून ओळखतो, माझी ओळख त्यांच्याशी तीन वर्षापूर्वी झाली. मात्र कायमच त्यांनी मला आदर आणि कुटूंबातील एका सदस्यासाठी वागणूक दिलेली आहे. आज मंचावर आल्यावर देखील त्यानी इतरांप्रमाणेच साधी खुर्ची मागवून तिच्यावर बसणे पसंत केले. सगळी प्रमुख माणसे मंचावर येऊन बसली की नाही याबद्दल ते कमालीचे दक्ष होते. आशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठ्या माणसांची खरी ओळख होते. सर्वसामान्यांचे नेते असं एकनाथ शिंदे यांना का संबोधले जाते ते यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी बोलताना, सिनेमात जसे संवाद बोलणारे हिरो हिरॉईन असतात तसेच आपल्या आजूबाजूला लोकांची कामे करून देणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते असतात त्यामुळे लोकांच्या नजरेत तेच खरे हिरो असतात. त्यांचा प्रवास साधा आणि सोपा नव्हता मात्र ज्या जिद्दीने त्यांनी तो पूर्ण केला त्यासाठी दाद द्यायलाच हवी. आज मोठमोठे प्रकल्प पूर्ण करत असताना देखील त्यांनी सर्वसामान्य लोकांशी असलेली आपली साथ सोडलेली नाही. मला त्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त कौतुक वाटते ते त्यांच्या शिक्षणाच्या ध्यासाबद्दल प्रतिकूल परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत मात्र आज एवढ्या व्यस्ततेतुन वेळ काढून त्यांनी आधी बीए केलं आणि आता ते एमए करत आहेत याबद्दल खरच मी त्यांना सलाम करते असंही त्या म्हणाल्या.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे हे खरे लोकनाथ असल्याचे सांगितले, राज्यावर पूर, नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळणे असे कोणतेही संकट कोसळले की मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातही घटनास्थळी एकनाथ शिंदे पोहोचले का..? एवढा एकच प्रश्न विचारला जातो कारण त्यांनी एकदा हातात सूत्र घेतल्यावर प्रशासन देखील निर्धास्त होत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अनोखा संगम पहायला मिळतो, मंत्री म्हणून मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अतिशय आत्मीयतेने वागत असल्याने आम्ही जरा जास्तच बिघडलो आहोत असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

या सोहळ्याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. समाजात वावरताना, मदत करताना, प्रशासनाशी संवाद साधताना, लोकांमध्ये वावरताना जमेल तेवढी खबरदारी घ्यावी लागते, कारण सत्ता,पद याचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी व्हायला हवा यासाठी आपण कायम दक्ष असतो असं त्यांनी स्पष्ट केलं. मी बोलतो कमी आणि ऐकतो जास्त त्यामुळे समस्येचा मुळाशी जाऊन त्यातील सर्व बाबी समजून घेणं मला सोपं पडतं आणि त्यांची सोडवणुक करता येते. युनिफाईड डीसीपीआर तयार करण्याचा निर्णय असेल किंवा कोकणातील पूरग्रस्तांना केलेली मदत असेल किंवा धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली क्लस्टर योजना असेल, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महमार्ग असेल, किंवा मग कोरोना काळात केलेले कार्य असेल कायम सर्वसामान्य माणसाचे हित हेच माझ्या डोळ्यासमोर असते आणि त्यानुसारच मी कार्यरत राहतो असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या आयुष्यातील अवघड प्रसंगात मी आणि माझं कुटूंब कोलमडून गेलो होतो त्यावेळी दिघे साहेबानी धीर दिला म्हणून आजवरचा हा प्रवास करणे शक्य झाले. आजवर मी जो काही राजकीय प्रवास केला तो फक्त आणि फक्त दिघे साहेबांमुळेच असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आजही लोकांची सुख दुःख आपली मानून काम करत असल्याने हे प्रेम आणि आदर मिळत असल्याचे सांगत सगळ्यांचे त्यांनी सगळ्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

आज पार पडलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या एका कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर लेखक दिग्दर्शक विजू माने यांनी सादर केलेली ‘शिंदे साहेब तुमच्यासारखे कुणीच नाही’…ही कविता उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेली. याशिवाय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या इंस्टाग्राम रिल्सच्या स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला. चार वर्षांच्या मुलाने या स्पर्धेत 50 हजारांचे पहिले पारितोषिक मिळवले.

या सोहळ्यासाठी अभिनेते सुनील शेट्टी अभिनेत्री आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक संगीतकार अवधूत गुप्ते, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संजय यादव, आमदार बालाजी किणीकर, आमदार विनोद अग्रवाल, ठाण्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, अभिनेते शरद पोंक्षे, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, परिवहन समिती सभापती विलास जोशी, एमसीएचआय क्रेडाईचे विकास ओबेरॉय, राजुभाई गरोडिया, जितूभाई मेहता आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसपीची फुकट बिर्याणी महागात, गृहमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk

महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाईचे सावट

Gauri Tilekar

वीज कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांनी गमावले प्राण

swarit