Lमुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. “मी काँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झाले आहेत. मी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली तेव्हा पक्ष सोडत आहे पण लोकांकरीता काम करत राहील असं म्हटलं होतं. मी तेव्हा राजकारण सोडलं नव्हतं. आताही माझ्यात जितकी क्षमता आहे त्या क्षमतेने जमिनीवर उतरुन काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण एसी रुममध्ये बसून या गोष्टी होतील असं वाटत नाही. आज मी लोकांकडून थोडा वेळ मागत आहे. मला थोडा वेळ द्या”, अशी विनंती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जनतेला केली. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
जेव्हा मी चित्रपटसृष्टीत 29-30 वर्षांपूर्वी माझी कारकिर्द सुरु केली तेव्हा मी अत्यंत साध्यासुध्या मराठमोळ्या घरातून आलेली मुलगी होती. आईला मेकअपबाबत काहीही कल्पना नव्हती. पण लोकांची साथ होती. आज मी माझ्या राजकीय वाटचालीत नवं पाऊल उचललं आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की, ही एक अजून एक अवघड वाट आहे. यासाठी लोकांचा पाठिंबा गरजेचा आहे. चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केलं. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेल”, असं उर्मिला म्हणाल्या आहेत.