HW News Marathi
महाराष्ट्र

रमेश देव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काल (२ फेब्रुवारी) वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची त्यांचे चिरंजीव व अभिनेते अजिंक्य देव यांनी माहिती दिली आहे. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना निधनावर शोक व्यक्त केला आहे, तर राजकीय नेत्यांनी सुद्धा रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

चित्रपटसृष्टीतला उमदा तारा निखळला – शरद पवार 

“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला उमदा तारा निखळला. कृष्ण-धवल काळापासून हिंदी चित्रपटांमध्येही अमीट ठसा उमवटणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक. त्यांची सदाबहार व चैतन्यदायी प्रतिमा नव्वदीतही टिकून होती. स्व. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

गौरवशाली अध्याय संपला – अजित पवार 

“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम रमेश देव यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्य जीवन महाराष्ट्रासाठी आदर्श होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

दिग्गज सदाबहार रंगकर्मी हरपला – अशोक चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते रमेश देव यांच्या निधनामुळे एक दिग्गज सदाबहार रंगकर्मी हरपला आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रमेश देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. चव्हाण यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, “रमेश देव यांनी हिंदी व मराठी चित्रसृष्टीतील असंख्य भूमिका समर्थपणे साकारल्या होत्या. ते घराघरात सुपरिचित असलेले अभिनेते होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग मला अनेकदा लाभला. ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हे तर सामाजिक संवेदना जपणारे एक सहृदयी व्यक्तीमत्व देखील होते. त्यांचे निधन चाहत्यांसाठी एक मोठा धक्का आहे. ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील”, असे नमूद करून अशोक चव्हाण यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

३ पिढ्यांनी रमेश देव यांच्या अभिनयाचा आस्वाद घेतला – फडणवीस 

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रमेश देव यांना श्रद्धांजली वाहताना असे म्हंटले की, “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सुमारे तीन पिढ्यांनी त्यांच्या अभिनयाचा आस्वाद घेतला. मराठी आणि हिंदी मिळून 500 चित्रपट त्यांनी साकारले. नाटकांमधून त्यांनी मराठी नाट्य विश्व समृद्ध केले, अमूल्य योगदान दिले. जितके चांगले कलावंत, तितकेच चांगले व्यक्तिमत्त्व सुद्धा. मालिका, जाहिरात विश्व सुद्धा त्यांनी गाजवले. मराठी सिनेसृष्टीने एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शान्ति”

 जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड – सुप्रिया सुळे 

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अभिनेते रमेश देव यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे २८५ चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात जिंदा दिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

असा नट पुन्हा होणार नाही – चंद्रकांत पाटील 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दुःख झाले. गेली अनेक दशकं त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांचासारखा नट पुन्हा होणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली ! ॐ शांती”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

News Desk

जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव; राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Aprna

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

News Desk