HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार! – अजित पवार

पुणे । पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरणार

पवार पुढे म्हणाले, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा अशी याची रचना असणार आहे. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रॅक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशातील सुविधांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती

पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी ‘मेडिसिटी’ वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीं आहे. पुणे- नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे . मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

रोजगारनिर्मितीवर शासनाचा भर

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. व्यवसाय पडला. त्यामुळे मनुष्यबळाला मदत करण्याची, युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.

विकासासाठी सर्वांना सोबत घेणार

पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात आणि राज्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून सर्व जाती धर्माला बरोबर विकास साधायचा आहे अशी शासनाची भूमिका आहे.

नागरिकांनी कार्यक्रमांना स्वागतावर खर्च करण्याऐवजी वृक्षारोपण किंवा शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्त्वाचे- तटकरे

तटकरे म्हणाल्या, परिसराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसोबत ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे आहेत. या प्रकल्पासाठी प्रादेशिक पर्यटन प्रकल्पातून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणखी ५ कोटींचा निधी पुढील टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण प्रकल्प १२ कोटी ५० लक्ष रुपयांचा आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशी चांगली कामे करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले.

सुनील टिंगरे म्हणाले, या परिसरात एक चांगल्या उद्यानाची गरज होती. आता ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असून त्याचा परिसरातील लहानथोरांना लाभ होणार आहे.

विविध विकासकामांचे भूमिपूजन

आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.पुणे पंचशील चौक, ताडीवाला रोड येथे नूतनीकृत शिल्पाचे उद्घाटन, फुलेनगर- नागपूर चाळ येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन, धानोरी जकात नाका येथे राजयोग मेडिटेशन सेंटर, अग्निशामक केंद्र, माजी सैनिक सांस्कृतिक भवन तसेच उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामभाऊ मोझे, कमलताई ढोले पाटील, नगरसेवक प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड, नगरसेविका शीतल सावंत, रेखाताई टिंगरे, उषाताई कळमकर आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

News Desk

महाड इमारत दुर्घटनेत ६० जणांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

News Desk

शिंद-फडणवीस सरकारची मोठी घोषणा! प्रतिलिटर पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

Aprna