HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज – अदर पूनावाला

मुंबई | देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यास अनेकांकडून विचारणा केली जात आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. दरम्यान Covishield लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटी रूपयांची गरज आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी अदार पूनावाला यांनी परवडणाऱ्या दरात सुरूवातील १०० दशलक्ष डोस देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. “कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते,” असं अदर पूनावाला म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या संवादादरम्यान यावर भाष्य केलं आहे.

“आम्ही भारतीय बाजारात लस जवळपास १५० ते १६० रूपयांमध्ये सप्लाय करत आहोत. जेव्हा ही लस तयार करण्याचा खर्च हा जवळपास २० डॉलर्स (अंदाजे १५०० रूपये) आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या म्हणण्यावरून कमी दरात ही लस उपलब्ध करून देत आहोत. असं नाहीये की आम्ही नफा कमवत नाही. परंतु आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे,” असं पूनावाला म्हणाले.

कोरोना महासाथीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर भारतातील काही राज्यांतील स्थिती चिंताजनक होत असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे चाचणीअंती आढळून आलं आहे, असं त्यांनी यापूर्वी सांगितलं. कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस ६० ते ७० टक्के प्रभावी असल्याचं आढळले. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतरानं देण्यात आली असता लस ९० टक्के प्रभावी आढळली.

मागच्या महिन्यात लसीकरणावरील तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारनं लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं आहे. इतर देशांत पहिल्या डोसनंतर सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिल्यास लसीची क्षमता वाढल्याचे चाचणीअंती आढळल्यानं या समितीने दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केली होती. “लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकार क्षमता वाढणे सुरू होते. पहिला डोस घेतलेल्या पन्नास वर्षांखाली लोकांतही लसीचा उत्तम प्रतिसाद आढळून आला. कोविड-१९ च्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मिळणारे संरक्षणही चांगलं आहे. एका डोसनंतर ७० टक्के लोकांनाही या संसर्गापासून पूर्णत: सुरक्षित आहेत,” असं पूनावाला यांनी सांगितलं.

Related posts

रेल्वेच्या ताब्यातील जागांचे खासगीकरण करण्याचा डाव

News Desk

देशात ३१ ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक ३’, ‘कंटेन्टमेंट झोन’मध्ये पुन्हा नियम कडक

News Desk

अयोध्येतील राम मंदिर भारतीय मुस्लीमांनी पाडले नाही | भागवत

News Desk