HW News Marathi
महाराष्ट्र

Welcome 2022 : नव्या वर्षात ‘या’ गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई |  आज २०२१ वर्षाचा अखेरचा दिवस असून अवघ्या काहीच तासांनी २०२२ ला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकांनी संकल्प केले असतील. या नवीन वर्षी काय काय करावं, काय खरेदी करावं, कशात गुंतवणूक करावी, अशा अनेक गोष्टींची तुमची लिस्ट तयार असेल. पण, या वर्षात अनेक गोष्टी महागणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला वर्षाच्या सुरुवातीपासूनच कात्री लागण्यास सुरुवात होणार आहे.

१ जानेवारी २०२२ पासून जीएसटी संबंधित काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना काही गोष्टींसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. उद्यापासून सरकारच्या जीएसटी नियमांमध्ये बदल होणार असून काही नवे नियम आणले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अजूनच महागाईचा सामना करावा लागणार आहे. नव वर्षाच्या सुरुवातीलाच ओला-उबेरसह हजार किंमतीहून अधिकचे कपडे महाग होणार आहेत.

पादत्राणे आणि कपडे

चप्पल, बूट आणि कपडे खरेदी करणे १ जानेवारीपासून अधिक महाग होईल. केंद्र सरकारने चप्पल, बूट आणि कपड्यांवरील जीएसटी ७ टक्क्यांनी वाढवला आहे. म्हणजेच ५ टक्क्यांवरून १२ टक्के केला आहे. तर रेडीमेड गारमेंट्समध्ये ५ टक्के जीएसटीची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना रेडिमेड कपड्यांची खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. दरम्यान, जीएसटी वाढल्याने किरकोळ व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचं कापड व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

ऑनलाईन अ‍ॅप्सद्वारे बुक केलेल्या ऑटो रिक्षा किंवा कॅबचा प्रवास

ओला, उबेरसारख्या ऑनलाईन पद्धतीने ऑटो रिक्षा किंवा कॅब बूक करणे देखील १ जानेवारीपासून महागणार आहे. ओला, उबेरच्या राईडसाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील. मात्र, इतर प्रवासी वाहनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

एटीएममधून पैसे काढणे

भारतीय रिझर्व्ह बँकने एटीएममधून मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

ऑनलाईन फूड डिलेव्हरी

केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी सारख्या खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या ई-कॉमर्स ऑपरेटर्सवर (ECOs) ५ टक्के जीएसटी लावला आहे. सध्या हा कर रेस्टॉरंट भरतात. मात्र, नवीन नियमानुसार फूड डिलिव्हरी ई-कॉमर्स ऑपरेटर्स हा कर भरतील, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठीही ग्राहकांना अधिक पैसे माजोवे लागतील.

बँकेतील व्यवहारांसाठी लागणार शुल्क

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) खातेधारकांना १ जानेवारीपासून मर्यादित प्रमाणात पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. बचत खात्यावर दरमहा ४ कॅश विथड्रॉवल मोफत असेल. त्यानंतर प्रत्येक विथड्रॉवलवर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. हे शुल्क कमीतकमी २५ रुपये एवढे असेल. बचत खात्यात पैसे जमा करण्यावर शुल्क आकारले जाणार नाही. १० हजारावरील रक्कम डिपॉझिट केल्यास त्यावर मात्र ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल, जे २५ कमीत कमी २५ रुपये असेल.

कार खरेदी करणे

मारुती सुझुकी, रेनॉ, होंडा, टोयोटा आणि स्कोडासह बहुतांश गाड्या नव्या वर्षात महाग होणार आहेत. १ जानेवारीपासून या गाड्यांच्या किमतींमध्ये २.५ टक्के वाढ होणार आहे. कच्चा माल, इतर पार्ट्स आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे देशातील कार निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा पर्याय निवडला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधी प्रचार करणार नाही ?

News Desk

कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी एसटी महामंडळ काढणार २००० कोटींचं कर्ज

News Desk

‘ईडी’चा यू टर्न, शरद पवारांनी तूर्तास चौकशीला येण्याची गरज नाही

News Desk