HW News Marathi
महाराष्ट्र

अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ करप्रणालीचा अवलंब आवश्यक, व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

नागपूर। क्लिष्ट आणि त्रासदायक प्रक्रियांना तिलांजली देतानाच नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन करदात्यांसाठी अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अशी करप्रणाली निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल (२९ एप्रिल) येथे केले. ते शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-एनएडीटी) भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या 74व्या तुकडीच्या प्रशिक्षण समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. मोहपात्रा, केंद्राचे प्रधान महासंचालक प्रवीणकुमार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले, भारतीय महसूल सेवेकडून प्रत्यक्ष कर संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य होत असते. ते करदात्यांना अनुकूल पद्धतींद्वारे गोळा करण्याची गरज असते. शासनाने अलीकडच्या काळात काही चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून करदात्यांसाठी स्नेहदायी अशी कार्यपध्दती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. करदाते आणि कर प्रशासक यांच्यातील परस्परसंवाद, विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर आदराच्या भावनेने साधला जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले .

ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेने ‘अपडेटेड रिटर्न’ सादर करण्यासारख्या आयकर विभागाने उचललेल्या पावलांचेही कौतुक करुन ते म्हणाले ‘लिटिगेशन मॅनेजमेंट’ तसेच ‘फेसलेस असेसमेंट’ योजनेच्या अंमलबजावणीसारख्या उपायांमुळे एक चांगली करपरिसंस्था निर्माण होऊ शकते. मिनीमम गर्व्हनमेंट आणि मॅक्सिमम गर्व्हनन्स या सुत्राशी अतुट बांधिलकी जोपासताना सरकारने व्यवसाय सुलभतेसाठी सातत्याने अनेक उपाय योजले आहे. याबाबतचे अनेक अनावश्यक कायदे रद्द केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात या परिस्थितीत सकारात्मक सुधारणा झाली आहे. विविध पातळ्यांवर धोरणात्मक उपाययोजना करुन यावर्षी सर्वात जास्त प्रत्यक्ष कर संकलन केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अभिनंदन केले.

कर हा केवळ सरकारसाठी महसूलाचा स्त्रोत नसून सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी महत्वाचे साधन असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले, कोविडच्या साथीमुळे अर्थव्यवस्था बाधित झाली असली तरी ती आता सुधारणेच्या मार्गावर आहे. देशाच्या आर्थिक वाढीचा दरही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. यापुढच्या काळात नव्या अधिकाऱ्यांनी जगभरातील चांगल्या कार्यपध्दतींचे अनुकरण करुन देशातील व्यवस्थेत कल्पक आणि नाविन्यपूर्ण बदल घडवावे. उपराष्ट्रपतींनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसह संस्थेतील सर्व धुरीणांचे अभिनंदन केले.

भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांच्या 74व्या दीक्षांत समारंभात, उपराष्ट्रपतींनी गुणवंत अधिकारी प्रशिक्षणार्थींचा 16 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला. नवल कुमार जैन या प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी अर्थ मंत्री सुवर्ण पदकासह विविध विषयातील प्राविण्य मिळवून 7 सुवर्ण पदक प्राप्त केली. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना ही पदके प्रदान करण्यात आली.

एनसीबी, ईडी, निवडणूक आयोग यासारख्या संस्थांना आयकर अधिकाऱ्यांची गरज भासते. आयकर अधिकाऱ्यांनी करदात्यांबाबत नैसर्गिक न्यायाचे तत्व जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. मोहपात्रा यांनी यावेळी केले.

भारतीय महसूल सेवेच्या 74 व्या तुकडी मध्ये 54 अधिकारी भारतीय महसूल सेवेतील असून दोन अधिकारी रॉयल भूतान सर्व्हिसचे आहेत. 21 महिला अधिकारी या तुकडीत असून या तुकडीमध्ये सर्वात जास्त अधिकारी उत्तर प्रदेश मधून आहेत. 20 टक्के अधिका-यांची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील आहे. 48% उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी अभियांत्रिकीची असून या तुकडीमध्ये 3 डॉक्टर, 3 सनदी लेखापाल आहेत, अ‍शी माहिती अकादमीचे प्रशिक्षण विभागाचे प्रधान महासंचालक प्रवीण कुमार यांनी दिली.

एनएडीटी ही भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठीची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. हे अधिकारी 16 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशभरातील आयकर कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्त केले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी व जनतेने लाभ घ्यावा! – दादाजी भुसे

Aprna

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी ९ डिसेंबरला घटनापिठासमोर सुनावणी

News Desk

मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद

swarit