HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार?”, कॉंग्रेसचा सवाल

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते. या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच निलंबित सचिन वाझेंनेही पत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचं नाव घेतलं आहे. यावरुनच कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंत्राटादारांकडून वसुली करण्यासाठी दबाव टाकला होता असं सचिन वाझेने पत्रात दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे की, सचिन वाझेने खळबळजनक विधान केले आहे. आणखी एका मंत्र्यावर वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना अडकली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणे हे मंत्रीही राजीनामा देतील का? हा नैतिकतेचा प्रश्न आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

अनिल परब यांच्यावर आरोप काय?

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून ५० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून ५० लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता” असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

अनिल परब यांनी आरोप फेटाळले

अनिल परब यांनी सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असं सांगतानाच मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

धुळे-नगर महापालिका निवडणुकांचे निकाल आज

News Desk

#LokSabhaElections2019 : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार नाहीत !

News Desk

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सहयाद्री अतिथीगृह येथे सत्कार

News Desk