HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांना पुन्हा संधी मिळणार का?

बारामती | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पुणे जिल्हा बँकेतील सर्वात ज्येष्ठ संचालक म्हणून दौंडचे आमदार रमेश थोरात हे ओळखले जातात. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा रमेश थोरात यांना संधी मिळणार का? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी १५ जानेवारीला जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली असून  बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली बैठक बोलवण्यात आली आहे. तर दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे सलग आठव्यादा जिल्हा बँकेवर निवडून गेले असून त्यातील सहा वेळा ते बिनविरोध निवडून गेले आहेत. संचालक मंडळातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी म्हणून रमेश थोरात यांच्याकडे पाहिले जाते. थोरात हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

गेले ३७ वर्ष थोरात हे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत असून तब्बल तेरा वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. तर काही काळ उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. थोरात यांनी बँकेत कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे.

१९८५ साली केवळ पीक कर्ज वाटप करणारी बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जात होते. मात्र, सहकारातील अभ्यासक असलेल्या रमेश थोरातांनी शेतीपूरक उद्योगांना देखील बँकेने कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यामुळे पिक कर्ज बरोबर सध्या शेती पूरक व्यवसाय देखील जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा बँकेने नुकतीच शंभर वर्ष पूर्ण केले असून थोरात हे पूर्णवेळ बँक व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना दिसतात. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तेरा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात थोरातांनी राजकारण विरहित केलेल्या कामांमुळे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या मनात त्यांच्या बाबत आदराचे स्थान आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून कुल यांचे मित्र तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवत भाजपाचा जिल्हा बँकेत चंचुप्रवेश केला आहे. कंद यांच्या विजयात कुल यांचा मोठा हातभार आहे. विजयानंतर कंद यांना फडणवीसांकडे कुलच घेऊन गेले होते. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात उभारी मिळाली असली तरी कुल यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा रमेश थोरातांना अजित पवार संधी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२वी पेपर तपासणीत असहकाराचा इशारा

News Desk

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk

“राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा; शिवसेनेला काही दुःख नाही”

News Desk