HW News Marathi
महाराष्ट्र

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

मुंबई | भाजप आमदार आशिष शेलार कायम शिवसेनेवर कायम निशाणा ठेऊन असतात. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून शिवसेनेवर बाण डागल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलारांना नागरिकशास्त्र वाचण्याचा सल्ला देत टोला लगावला आहे.

आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा

यशवंत जाधव यांनी त्यांच्या ट्विटर वरून आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा. मुंबई महानगरपालिका कायदे आणि नियमानेच चालते. तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका. तुम्ही काय काय घाण केली, तुमचे “बगलबच्चे” कोण, हे आम्हाला माहिती आहे. मराठीचे ढोंग करून त्यांची वकिली करू नका”, अशा शब्दात यशवंत जाधव यांनी शेलारांवर टीकास्त्र डागलं आहे.

“पालिकेच्या प्रत्येक विभागाची आणि तेथील कर्मचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. त्या-त्या विभागातल्या बढत्या नियमानुसार वेळच्या वेळी करण्यात आल्या आहेत. यापुढेही होतील. मनाला वाटले आणि निर्णय घेतले, असे करायला पालिका म्हणजे तुमच्या “पाळीव यंत्रणा” नाही”, असा चिमटा जाधव यांनी शेलारांना काढला.

‘”आम्ही कायद्याच्या चौकटीत असेल तेच करू आणि जनतेच्या हिताचेच निर्णय घेऊ. पालिकेतील तुमचा अवतार संपला आहे. आणि उरलेला सहा महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. पालिकेतील कामकाज कायद्यानुसार कसे चालते, त्याची माहिती वेळ काढून तुमच्याच नगरसेवकांकडून घ्या”, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

‘मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या १३२ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला. पण ४ सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?’, असा सवाल शेलार यांनी व्यक्त केला होता.

‘चिटणीस पदावर शुभांगी सावंत यांना डावलून संगीता शर्मा यांना बढती. आता १३२ मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार. मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?) मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!’, असंही शेलारांनी म्हटलेलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार? जयंत पाटील म्हणतात…

News Desk

भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल

Aprna