HW News Marathi
महाराष्ट्र

योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार…!, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण चांगले तापले आहे. राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्यभरातील भोंगे उतरवण्याचे अल्टीमेटम दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. परंतु, बैठकीत मनसे आणि भाजपने बहिष्कार टाकला होता.  यापूर्वीच सर्वोच्च न्यायालायने भोंग्यासंदर्भात भोंग्यासंदर्भात नियमावली दिली आहे. 

 “राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सर्वोच्च न्यायालयने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली.

इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते. आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवार जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.

Related posts

मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज! – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk

भुजबळांना जामीन मिळावा | प्रकाश आंबेडकर

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

News Desk