मुंबई | राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज (११ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीची माहिती व घेतलेला निर्णय सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो
परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही, राज्यातील नागरिकांनी स्वत:च स्वत:चा रक्षक होतांना खबरदारी घ्यावी, आम्ही जबाबदारी घेतो, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिस्त पाळली तरच ३० तारखेपर्यंत आपण बाजी मारू शकू, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये हे सुरुच राहणार
या लॉकडाऊनच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, औषधे यांची वाहतूक आणि पुरवठा सुरुच राहतील, हेही त्यांनी स्पष्ट केले.
काय करायचे यावर काम सुरु
१४ एप्रिलनंतर काय करायचे यावर काम सुरु आहे त्याची माहिती मी आपणा सर्वांना १४ तारखेपर्यंत देईनच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या शृखला तोडणार असल्याचे ते म्हणाले. शक्यतो घराबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जावे लागले तरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
परिस्थितीच तशी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा करतांना त्यांच्या-आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. आतापर्यंत आमच्या तोंडावर पट्टी बांधण्याचे धाडस कुणी केले नाही, परंतू सध्याची वेळच तशी आली आहे असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांची संख्या वाढते आहे, ही लपवण्यासारखी बाब नाही. पण आपण चाचण्याही वाढवल्या आहेत. लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत आहोत. गेट वे ऑफ इंडिया जसं मुंबईचं प्रवेशद्वार आहे. तसेच मुंबईचे विमानतळही आहे. येथे जगभरातून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले त्यांची तपासणी झाली नसल्याचे ते म्हणाले. आपण गुणाकार मंद राखण्यात यश मिळवले असले तरी तो शुन्यावर आणण्याचा, एकही रुग्ण कोरोनाबाधित होणे नको असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ज्येष्ठांची काळजी घ्या
घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत ३३ हजार चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्याची माहिती देतांना त्यांनी १ हजार पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. बाधित रुग्णांमध्ये ६५ ते ७० टक्के लोकांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे असल्याचे ते म्हणाले. बरे होऊन घरी जाणाऱ्या, क्वारंटाईन लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी जाणाऱ्या लोकांचा आकडा मोठा असल्याचे ते म्हणाले. दुर्देवाने राज्यात काही मृत्यू झाल्याचे सांगतांना त्यात हायरिस्क गटातील नागरिकांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बाधित क्षेत्र पूर्ण सील
मुंबईमध्ये ज्या भागात पॉझेटिव्ह रुग्ण आढळले ते विभाग पूर्ण सील केल्याचे सांगतांना येथील नागरिकांना सुरुवातीला अडचणी आल्याचे, गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले. पण तिथेही जीवनावश्यक वस्तु, औषधे, भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पॉझेटिव्ह रुग्ण आलेला भागच एकप्रकारे क्वारंटाईन करत असल्याचे सांगतांना या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी महानगरपालिका घरोघरी जाऊन करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली
महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा
आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणे या संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो या संकटातही महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती केली. ही बंदी किती दिवस हे आपल्याच हातात असल्याचे सांगतांना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणुची साखळी तुटेल याची जाणीवही त्यांनी करून दिली. संपूर्ण देश एकसंघपणे या विषाणुशी लढतोय, यात कोणतेही राजकारण करायचे नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही एकजुट सदासर्वदा अशीच कायम ठेवली तर महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.