मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आता डॉ. मशहूर गुलाटी (सुनील ग्रोवर) च्या जागी स्टॅण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तवची एण्ट्री पक्की झाली आहे. राजू श्रीवास्तवने स्वतः या बातमीला दुजोरा दिला. राजू नुकताच या कार्यक्रमाच्या एका भागात दिसला होता. राजूसोबत या भागात एहसान कुरेशी आणि सुनील पाल हे विनोदवीरही सहभागी झाले होते. स्वतः राजूने सांगितले की, ‘या कार्यक्रमाच्या पुढील भागात मी सहभागी होणार आहे याचा मला आनंदच होत आहे. या कार्यक्रमात मी एक पाहुणा म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे.’ या कार्यक्रमातील कलाकारांसोबत काम करायला राजूने आधीच सुरुवात केली आहे. तर चॅनलही त्याच्या कामावर खूश आहे. या कार्यक्रमात जॉनी लिव्हरची मुलगी जिमी लिव्हरसुद्धा सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘स्पॉटबॉय’ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन आयडॉल’च्या अंतिम फेरीचे चित्रीकरण सुनील फिल्मसिटीमध्ये करत होता. तो या कार्यक्रमात डॉ. मशहुर गुलाटी आणि रिंकू भाभीची व्यक्तिरेखा साकारत होता. सुनीलचे चाहते त्याला पुन्हा डॉ. मशहुर गुलाटीच्या व्यक्तिरेखेमध्ये पाहून खूश झाले असले तरी कपिल शर्मा शोमध्ये तो परतणार की नाही, यावर प्रश्न चिन्हच आहे.
सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर प्रत्येक दिवसाला या प्रकरणी नवनवीन बातम्या येत होत्या. सुनील या कार्यक्रमात तूर्तास तरी परतणार नसला तरी अली असगरने बुधवारपासून कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
सोनी टीव्ही सध्या अली असगर, चंदन प्रभाकर आणि सुनील ग्रोवर यांना काही काळासाठी वगळण्याच्या विचारात आहेत. याचाच एक भाग म्हणून चॅनलने राजू श्रीवास्तवला कार्यक्रमात अधिक भागांसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोनी टेलिव्हिजनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही नुकतेच एक ट्विट करण्यात आले होते. यात ‘गेस हू…’ असे लिहिलेला फोटो पोस्ट करत ‘कोई आ रहा है कपिल के मोहल्ले में अपनी कलाकारी का धमाका करने’, असे कॅप्शनही दिले होते.
ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतत असताना विमान प्रवासादरम्यान कपिलने मद्यधुंद अवस्थेत सुनीलला शिवीगाळ करत मारहाणही केली होती. त्यामुळे सुनीलसह चंदन प्रभाकरनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.