HW News Marathi
मुंबई

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

मुंबई । मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे (Mumbai Coastal Road) सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (१९ सप्टेंबर) येथे व्यक्त केला.

मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल सायंकाळी केली.

प्रकल्पाच्या प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करुन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गीका बदल (इंटरचेंज) सह संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प विषयी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.

किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे

किनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे.

किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल.

हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये ८.५ कि.मी.ची सागरी पदपथ निर्मिती.

किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतूक योजिले असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल.

रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास.

प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk