मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे २०१९ साली म्हणजेच आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले रिंगणात उतरणार आहेत. याबाबत वांद्रे पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा रामदास आठवलेंनी घेतला.
या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशही आठवलेंनी दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात महामेळावाचे आयोजिन करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रामदास आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिपाइंचे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले २००९ मध्ये पराभूत झाले होते. मात्र १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. या भागात आठवलेंच्या रिपाइंची संघटनात्मक बांधणीही आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.