June 26, 2019
HW Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा सगल आज (१० जानेवारी) तिसऱ्या दिवशी देखील संप कायम असल्यामुळे मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत. बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही.  आक्रमक पवित्रा घेत संप कायम ठेवल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांवर करवाई केल्यामुळे  वडाळा बस आगाराला कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबियांनी घेराव घातला आहे.

बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली आहे. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप अधिक चिघळला आहे. वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (७ जानेवारी) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा

बेस्टचे शिष्टमंडळ आज (१० जानेवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले आहे. यावेळी या बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आल्यानंतर आज सकाळी १०.३० च्या सुमारास सर्व बेस्ट कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेरपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन मनसेकडून देण्यात आले होते.

या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • बेस्टचा ‘क ‘अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ ‘अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
  • २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
  • एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
  • २०१६-१७ आणि १७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
  • अनुकंपा भरती तातडीनं सुरू करावी

बेस्टचे सहा कोटींचे नुकसान

बेस्ट उपक्रमाला दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. परंतु गेल्या दोन दिवसांत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्टच्या दोन दिवसांचा महसूल बुडाला आहे. बुधवारी (९ जानेवारी) वडाळा, वरळी, वांद्रे आगारातील ११ बसगाड्या सकाळी बस आगाराबाहेर पडल्या. तसेच या बसगाड्याही काही तासांनी बस आगारांमध्ये परतल्या.

Related posts

विद्याविहार स्थानकाजवळ अपघात, दोन जण जखमी

News Desk

ब्रेकिंग | भिवंडीत ऑईल गोदामाला भीषण आग

News Desk

भाजपच्या नाना पटोलेची उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा

News Desk