HW News Marathi
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई । दादरच्या इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)
यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून या स्मारकाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (१६ नोव्हेंबर) दिले.
इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.  त्यानंतर सामाजिक न्याय, एमएमआरडीए, महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किणीकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही आर. श्रीनिवासन, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, शिल्पकार राम सुतार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
४.८ हेक्टर क्षेत्रफळ जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारत असून या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १०९० कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, बेसमेंटमधील वाहनतळाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावलौकिकाला साजेसे स्मारक इंदू मिलच्या परिसरात उभारले जात असून त्यांचे स्थापत्य काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकर यांचा भव्य पुतळा त्याशिवाय सुसज्ज वाचनालय, पार्किंग, बसण्याची व्यवस्था, मोठे सुसज्ज सभागृह तयार करण्यात येणार आहे. कामाला अधिक गती देऊन निर्धारित केलेल्या वेळेत स्मारकाचे काम पूर्ण करा अशा सूचना देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २५ फूट पुतळा प्रतिकृतीस लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गाझियाबाद येथील कार्यशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार केली आहे.  लवकरच एक सर्वसमावेशक समिती तयार करुन या समितीने पुतळ्याची प्रतिकृती अंतिम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
स्मारकाच्या कामाला गती मिळणार- उपमुख्यमंत्री
इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक आकाराला येत आहे. आज या स्मारकाच्या कामाची पाहणी करून त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले असून स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रारंभी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाची  तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी प्रकल्पाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांचे सादरीकरण केले.
स्मारकाविषयी….
● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील पुतळ्याची उंची- पादपीठ ३० मीटर (१००फूट) उंच व पुतळा १०६.६८ मीटर ( ३५० फूट) उंच अशी एकूण १३६.३८ मीटर ( ४५० फूट) उंची असेल
● प्रवेशद्वार इमारतीमध्ये माहिती केंद्र, तिकीट घर, लॉकर रूम, प्रसाधनगृह, सुरक्षा काऊंटर, स्मरणिका कक्ष, उपहारगृह व नियंत्रण कक्ष इत्यादी बाबींचा अंतर्भाव असेल.
● स्मारकाचे काम एकूण क्षेत्रफळ ४.८ हेक्टरजागेत सुरू असून बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ – ४६३८८ चौ.मी. आहे.  तर हरित जागेचे क्षेत्र ६८ टक्के आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेचा रविवार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

swarit

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna

बोटीतून गरोदर महिलेला रुग्णालयात पोहचवले

News Desk